भूम : ‘रात्र ऐसी गोठलेली, चंद्रही थरकापला’ ही गझल पं. नाथराव नेरुळकर यांनी सादर करुन उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या संगीत समारोहास भूम येथील रसिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.१३ सप्टेंबर रोजी पंडित पलुसकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील पं.स. सभागृहात सायंकाळी ७ वाजता मराठवाड्याचे ख्यातनाम गायक पंडित नाथराव नेरुळकर व सुरमनी धनंजय जोशी (नांदेड) यांची शास्त्रीय संगिताची मैफल भरविण्यात आली. प्रारंभी सुरमनी धनंजय जोशी यांनी कार्यक्रमाची सुरुवात राग रागेश्री यांनी केली. विलंबित बडा ख्याल ताल एकताल मध्ये पेश करुन उपस्थितांच्या टाळ्या घेतल्या. नंतर त्यांनी ‘गैडसारंग’ या रागाची बंदीश सादर केली व मैफिलीत रंग आणला. यानंतर पंडित नाथराव नेरुळकर यांनी ‘जनसन मोहिनी’ या रागाने सुरुवात केली. त्याच रागात त्यांनी स्वत:ची गझल ‘रात्र एैसी गोठलेली चंद्र ही थरकापला’ ही सादर करुन मैफिल रंगतदार केली. शेवटी ‘लई नाही लई नाही मागणार’ (अभंग) भैरवी घेवून कार्यक्रमाची सांगता केली. तबला साथ प्रसाद देशमुख तर हार्मोनियमन साथ केसकर यांनी उत्तम करुन कार्र्यक्रम दर्जेदार केला. संध्याकाळी ८ ते १० मैफल सुरु होती. या संगीत मैफलिस भूम, उस्मानाबाद, करमाळा, परंडा, वाशी आदी परिसरातून श्रोते आले होते. कार्यक्रमासाठी नादब्रम्ह संगीत विद्यालय, प्रदीप गवळी, योगेश वाघमारे, धनंजय सपकाळ आदींनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)
‘रात्र ऐसी गोठलेली, चंद्रही थरकापला..’
By admin | Updated: September 15, 2014 00:25 IST