जालना : शहरासह जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचे तांडव कायम होते. अनेक घरांवरील पत्रे उडाली, विद्युत खांब व तारा निखळल्याने वीजपुरवठा खंडित झाला. गेल्या चोवीस तासापासून अंधारात असलेले जालना शहर शनिवारी सायंकाळनंतर उजळले.दुपारपर्यंत कडक ऊन होते. मात्र नंतर ढगाळ वातावरण झाले. वादळी वाऱ्यासह शहरात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला.शुक्रवारी शहरात काही ठिकाणी उन्मळून पडलेली झाडे बाजूला करण्याचे काम आजही सुरू होते. ग्रामीण भागात पावसाचा जोर अधिक होता. प्रचंड वेगात पाऊस झाला. तीर्थपुरी, दैठणा, जोगलादेवी या तीन ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस. अन्य ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. ३.३० ते ४.१५ च्या दरम्यान. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. विद्युत तारा निखळल्या, विद्युत खांब कोसळले. त्यामुळे गावातील वीजपुरवठा खंडित होता. अवकाळी पावसामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली. जालना तालुक्यातील गोलापांगरी, बठाण, इंदेवाडी, अंतरवाला, सामनगाव, रामनगरसह बाजी उम्रद, जळगाव, सावरगाव, हडप, भाटेपुरी, हातवन, खनेपुरी यासह अनेक गावात वादळी पावसाने हजेरी लावली. भोकरदन तालुक्यातील लेहा, शेलूद येथे पाऊस झाला. अंबड व बदनापूर तालुक्यात पाऊस झाला. भोकरदन तालुक्यातील हसनाबाद व परिसरात दुपारी १ ते ३ वाजेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी पडझड झाली. भोकरदन रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडी उन्मळून पडल्याने वाहतुक ठप्प झाली होती.या अवकाळी पावसाने शुक्रवारी रात्री शहरात निम्म्यापेक्षा अधिक भागात अंधार होता. अनेक रस्त्यांवर विद्युत तारा निखळलेल्या होत्या. महावितरणच्या वतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांसह खाजगी कामगारांनी आज पहाटे ३ वाजेपर्यंत विविध भागात काम करून बहुतांश भागातील वीजपुरवठा सुरळीत केला. दरम्यान, शनिवारी वादळी वाऱ्यामुळे पुन्हा काही भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यासाठी रात्री उशिरापर्यंत दुरूस्तीचे काम सुरू होते. पिंपळगाव रेणुकाई येथे अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाली. येथील माया कैलास घोटे वय १६ या मुलीच्या अंगावर घरातील भींत पडल्याने ती दबली होती. गावातील शिवाजी सास्ते, गजानन गाडेकर , तुकाराम गाढे यांनी भर पावसात भिंतीचा मलबा बाजूला करून त्या मायाचे प्राण वाचविले. जखमी मायाला उपचारासाठी हलविण्यात आले. तसेच येथून जवळच असलेल्या वरूड येथील सुभद्राबाई आनंदा वाघ ह्या शेतातून घराकडे येत असताना रस्त्यावरील खांब त्यांच्या अंगावर पडल्याने त्या गंभीररित्या जखमी झाल्या त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
\ दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाचे तांडव
By admin | Updated: April 12, 2015 00:51 IST