जालना : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पोलीस शिपाईच्या ४२ जागांसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत गुरूवारी ७४८ उमेदवारांना बोलावण्यात आले होते. त्यापैकी ५७१ उमेदवार मैदानात उपस्थित होते. त्यापैकी ५११ उमेदवार मैदानी चाचणीसाठी पात्र ठरले आहेत. ६० उमेदवार अपात्र ठरले आहेत. सीसीटीव्हीची नजर आणि कडक बंदोबस्तात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या पोलीस शिपाई भरतीमध्ये मराठवाड्यासह राज्यभरातून उमेदवारांनी अर्ज केले आहेत. उन्हाची तीव्रता असून सुध्दा उमेदवार पदासाठी पात्र ठरण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावून मैदानीचाचणी देत असल्याचे चित्र आहे.गुरूवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेला सकाळच्या सत्रात उमेदवारांमध्ये कमालीचा उत्साह बघण्यास मिळत होता. कागदपत्र तपासणीपासून ते उमेदवारांची संपूर्ण तपासणीसाठी पोलीस कर्मचारी सुध्दा बारकाईने उमेदवारांची छाती.उंचीची तंतोतंत मोजणी करण्यात मग्न होते. गुरूवारी ५७१ उमेदवारांची विविध चाचण्या घेण्यात आल्या त्यात ५११ उमेदवार मैदानीचाचणीसाठी पात्र ठरले आहेत. उमेदवारांची गोलाफेक, लांबउडी, १६०० मिटर धावणे छातीची मोजणी आणि सर्वात महत्वाचे म्हणजेच उंच आदींची मोजणी करण्यात आली. त्यात ६० उमेदवार अपात्र ठरले आहेत. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या भरतीला १ हजार १६४ उमेदवार हजर होते त्यापैकी १ हजार २६ उमेदवार मैदानीचाचणीसाठी पात्र ठरले आहेत. तर १२६ उमेदवार अपात्र ठरले आहेत.यावेळी पोलीस अधिक्षक ज्योतीप्रिया सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, अभय देशपांडे आदीसह पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
दुसऱ्या दिवशी ५११ उमेदवार मैदानी चाचणीसाठी ठरले पात्र
By admin | Updated: March 24, 2017 00:33 IST