परतूर : सध्या शेतकरी पेरणीचे दिवस असल्याने शेती मार्गदर्शन व शासनाच्या कृषी योजनेच्या माहितीसाठी तालुका कृषी कार्यालयात पायपीट करत असतांना कृषी कार्यालयात शुक्रवारी अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयाला दांडी मारल्याने छावा कार्यकर्त्यांनी कृषी अधिकारी आनंद कांबळे यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालत निषेध व्यक्त केला.कृषी कार्यालयाच्या पंचनाम्यानंतरही या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दखल घेतलेली दिसत नाही. १३ जून रोजी रायपूर येथील शेतकरी आनंदसिंग मरमट व खांडवी येथील शेतकरी दत्ता बरकुले हे बियाणांसंदर्भात मार्गदर्शन व गारपीटग्रस्तांना पुरवणी यादीसंदर्भात या कार्यालयात दुपारी १२ वाजेच्या सुमारास आले असता त्यांना कार्यालयात शुकशुकाट दिसला. त्यांनी कार्यालयाचा पंचनामा करण्यासाठी तहसीलदारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो न होऊ शकल्याने छावा संघटनेला व काही पत्रकारांना बोलावले. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रिकाम्या खुर्चीला फुलांचा हार घालत या प्रकरणाचा निषेध केला. यावेळी या कार्यालयात एकूण २० कर्मचाऱ्यांपैकी लिपिक कुलकर्णी, शिपाई श्रीधर बेले, लिपिक हुंडीवाल व सतीश राठोड हे चारच कर्मचारी कामावर हजर होते. महिन्याचा दुसरा शनिवार आणि रविवारसह सलग तीन दिवस कार्यालयाला दांडी मारण्याचा प्रकार येथील अधिकारी आणि कर्मचारी करत असल्याचे उघड झाले आहे. (वार्ताहर)
रिकाम्या खुर्चीला हार
By admin | Updated: June 15, 2014 00:59 IST