सतीश जोशी, परभणीपरभणी जिल्ह्याचे कबड्डीमध्ये राज्य आणि राष्ट्रीयस्तरावर मोठे योगदान आहे. जिल्ह्यातील कबड्डीच्या कार्यकर्ते, पंच, खेळाडू आणि प्रशिक्षकांनी आपल्या कर्तृत्वाने राष्ट्रीयस्तरावर छाप टाकलीच नाही तर या जिल्ह्याने महाराष्ट्राला अनेक चांगले खेळाडू दिले. हा खेळ जोपासण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय खेळाडू तथा छत्रपती पुरस्कार विजेते मंगल पांडे यांनी व्यक्त केली.कबड्डी दिनाच्या पूर्वसंध्येला ते बोलत होते. ते म्हणाले की, कबड्डीचे सर्वेसर्वा बुवा साळवी यांचा १५ जुलै हा जन्मदिवस कबड्डी दिन म्हणून साजरा होतो. किशोर आणि कुमार गटातील महाराष्ट्रातील उदयोन्मूख गुणवंत कबड्डीपटूंना ५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती या दिनाच्या निमित्ताने देण्यात येते. आता हे स्वरुप व्यापक होत असून कार्यकर्ते, पंच, जिल्हा यांना आता विविध पुरस्कार दिले जात आहेत. महाराष्ट्राची कबड्डी ही आता आंतराष्ट्रीयस्तरावर गेली आहे. राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रातर्फे खेळताना परभणी जिल्ह्यातील खेळाडूंनी अनेक विजेतेपद मिळवून दिले. किशोर गटात परभणीचा संघ दरवर्षी तृतीय येतो, कुमार गटात एकदा द्वितीय तर एकदा तृतीय आला. प्रा. चंद्रकांत सातपुते, गुलाब भिसे (कोल्हावाडी), भारत धनले (खेडूळा), माधव शिंदे (तरोडा), राजेश बोबडे (गोपा), दिलीप निर्मळे (धारासूर), प्रकाश हरगावकर (पाथरी), तुकाराम शिंदे (रामपुरी) यांनी ग्रामीण भागात कबड्डी जीवंत ठेवली. नवनाथ भालेराव, प्रा. माधव शेजूळ, यु. डी. इंगळे, ज्ञानेश्वर गिरी, आयुब पठाण, गोविंद अवचार, डिगांबर कापसे, डिगांबर जाधव, माणिक राठोड यांचेही जिल्ह्याच्या कबड्डी विकासात योगदान आहे. माजी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर, डॉ. भीमराव निर्वळ, सुरेश जाधव, आर. टी. ढोबळे, प्रा. उद्धवराव सोळंके, श्रीमंत कदम, प्रसाद कुलकर्णी यांचेही सल्लागार म्हणून मार्गदर्शन लाभते. परभणी जिल्ह्याने आतापर्यंत ५० ते ६० राष्ट्रीय खेळाडू दिले आहेत. परभणीचे डिगांबर कापसे हे २००१ साली महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने विजेतेपद पटकाविले होते. थोडक्यात काय तर कार्यकर्ते, पंच, प्रशिक्षक, खेळाडू म्हणून भूमिका बजावताना परभणी जिल्ह्यास राज्य व राष्ट्रीयस्तरावर बहुमान प्राप्त करुन दिला, असेही मंगल पांडे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मंगल पांडे यांच्या रुपाने परभणी जिल्ह्यास पहिल्यांदाच खेळातील बहुमानाचा छत्रपती पुरस्कार मिळाला आहे. मंगल पांडे यांच्यासारखे अनेक कार्यकर्ते, प्रशिक्षक, पंच, खेळाडूमुळे परभणी जिल्ह्याला बहुमान प्राप्त झाला.बुवा ऊर्फ शंकरराव साळवी यांचा जन्मदिवस हा १५ जुलै रोजी कबड्डीदिन म्हणून साजरा होतो. कबड्डीला आंतराष्ट्रीयस्तरावर नेण्यासाठी बुवांनी आयुष्यभर प्रयत्न केले. आज कबड्डी, खो-खो, कुस्ती या सारखे ग्रामीण खेळ जोपासण्याची गरज असून शासनाप्रमाणेच राजकीय नेते मंडळी, पक्षांनी देखील त्यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे. छत्रपती पुरस्कार विजेते मंगल पांडे यांच्याशी कबड्डी दिनानिमित्त केलेली बातचीत.
कबड्डी खेळ जोपासण्याची गरज
By admin | Updated: July 15, 2014 00:48 IST