औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस मिळावा म्हणून जवळपास एक लाख ५० हजार नागरिक प्रतीक्षेत आहेत. आतापर्यंत १०० ते १२५ दिवस उलटले तरी अनेकांना लस मिळालेली नाही. दरम्यान, बुधवारी मध्यरात्री औरंगाबाद जिल्ह्याला फक्त १९ हजार लसींचा साठा देण्यात आला. त्यातील सात हजार महापालिकेच्या वाट्याला, तर १२ हजार ग्रामीणसाठी वितरित करण्यात आल्या. शहरात हा साठा अवघ्या तासाभरातच संपणार आहे.
मागील दोन ते अडीच महिन्यांपासून लसीचा तुटवडा भासत आहे. केंद्र शासनाकडून अत्यंत कमी प्रमाणात डोस देण्यात येत आहेत. शहरी भागात पाच दिवसांपासून लसीकरण बंद होते. दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांची संख्या तब्बल ८२ हजारांपर्यंत पोहोचली आहे. प्रतीक्षा यादी वाढत असल्याने महापालिकेने साठा मुबलक प्रमाणात द्यावा, अशी मागणी शासनाकडे केली होती. मात्र, प्रत्यक्षात बुधवारी रात्री १० वाजता सात हजार लसींचा साठा देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. ग्रामीण भागातही प्रतीक्षा यादी जवळपास ७० हजारांपर्यंत पोहोचली आहे. त्यांना १२ हजार डोस देण्यात आले. अवघ्या दोनच दिवसांत हे डोस संपतील. त्यानंतर लसचा पुन्हा तुटवडा भासणार हे निश्चित.
असा रंगला लसींचा खेळ
मंगळवारी आरोग्य उपसंचालक कार्यालयाचा मोठा ट्रक पुण्याला लस आणण्यासाठी रवाना करण्यात आला. बुधवारी सायंकाळी औरंगाबाद जिल्ह्यासाठी शासनाकडून साठा देण्यात आला. मात्र, औरंगाबाद शहराला किती डोस मिळाले, ग्रामीणसाठी किती याचा आकडा रात्री उशिरापर्यंत लपवून ठेवण्यात आला. महापालिका, जिल्हा प्रशासनालाही आकडा कळविण्यात येत नव्हता. महापालिकेला मध्यरात्री आकडा सांगण्यात आला.
महापालिका करणार शासनाकडे तक्रार
मध्यरात्री २ ते ३ वाजता महापालिकेला तुटपुंज्या स्वरूपात साठा देण्यात येतो. लस किती येणार हे अगोदरच सांगितले तर मनपाला दुसऱ्या दिवशी किती ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करायचे, याचे नियोजन करता येते. आरोग्य उपसंचालक कार्यालयातील अधिकारी आकडा लपवून ठेवतात. त्यामुळे मनपाला दुसऱ्या दिवशी नियोजन करताना अडचणी निर्माण होत आहेत. यासंदर्भात थेट शासनाकडेच मनपा तक्रार करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.