जालना : संपूर्ण जिल्ह्यातील गावे पाणंदमुक्त करण्यासाठी सरपंचांसोबतच ग्रामस्थांनी आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे मत पाटोदा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भास्कर पेरे यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषदच्या वतीने हगणदारी मुक्त गाव करण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम जाधव, उपाध्यक्ष अनिरूध्द खोतकर, अतिरीक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, समाजकल्याण सभापती शहाजी राक्षे, दगडवाडीच्या सरपंच आशाताई पांडे आदींची उपस्थिती होती. पेरे म्हणाले, गावात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता वाढल्यानेच विविध आजार वाढले आहेत. गावाच्या सरपंचाने जर ठरविले संपूर्ण गाव हगणदारी मुक्त करणार तर ते होऊ शकते. त्यासाठी पहिल्यांदा सरपंचाने आपला सरपंचपणाची झूल अंगावरून उतरवून जास्तीस जास्ती नागरिकांशी संवाद साधून त्यांना हगणदारीमुक्तचे महत्व पटवून द्यावे.गावे हगणदारीमुक्त करणे हे फार अवघड काम आहे. त्यासाठी खूप परिश्रम घेण्याची गरज आहे.माझ्या गावात अडाणी बायकांनी कर्ज काढून त्यावेळ चार हजार रूपयात संडास बांधला आत्ता शासन १२ हजार रूपये देऊनही शौचालय बांधले जात नसल्याची खंत पेरे यांनी व्यक्त केली.सरपंचांनी पक्षभेदाभेद सोडून सर्वांना सोबत घेऊन गावात विकास करणे गरजचे आहे.यावेळी खासगावचे सरपंच संतोष लोखंडे यांनीही गावात केलेल्या विकासाबद्दल उपस्थित सरपंचाना मार्गदर्शन केले. यावेळी जि. प. उपाध्यक्ष अनिरूध्द खोतकर यांनी जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर महिला सरपंच निवडून आल्या आहेत. त्यांच्या पतींनी त्यांना सरपंच म्हणून वावरण्यासाठी मुभा देण्याची गरज आहे. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांनी स्वच्छ भारतची संकल्पना पटवून सांगितली.जिल्ह्यातील गावांना हगणदारीमुक्त करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे चौधरी म्हणाले. जि.प. अध्यक्ष जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हातील १३८ गावांचे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आदींसह जि.प. सदस्यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
मानसिकता बदलण्याची गरज..
By admin | Updated: November 30, 2015 23:29 IST