लातूर : लातूर मनपाच्या प्रभाग क्रमांक ११ (ब) साठी झालेल्या पोटनिवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला सर्वाधिक १२२५ मते पडली असून, त्या खालोखाल भाजप उमेदवारास १०७३ मते पडली आहेत़ बुथ क्रमांक १० मधील ६५१ मतदारांची अतिरीक्त मतदार यादी समाविष्ट केली नव्हती़ मात्र या यादीतील मतदारांना न्यायालयाच्या निर्देशानुसार मतदानाचा हक्क देण्यात आला होता़ या यादीतील ६५१ पैकी २८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, त्याची मतमोजणी न्यायालयाच्या निकालानंतर होणार आहे़ प्रभाग क्रमांक ११ (ब) मधील नगरसेवक विक्रमसिंह चौहान यांनी राजीनामा दिल्यामुळे जागा रिक्त झाली होती़ त्या जागेसाठी रविवारी मतदान झाले असून, सोमवारी सकाळी ९ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला़ या निवडणूकीत ८ हजार ४५ मतदारांपैकी ३ हजार ३६५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला़ त्यात राकाँचे समीर शेख यांना १२२५ मते मिळाली असून, भाजपाचे दयानंद कलशेट्टी यांना १०७३ मते मिळाली आहेत़ भाजप उमेदवारापेक्षा १५२ मते राष्ट्रवादीच्या उमेदवाराला जास्त पडली आहेत़ तर शिवसेनेचे उमेदवार वैभव बिरादार यांना ६५२, रासपच्या अयोध्याबाई अग्रवाल यांना १०५ मते पडली आहेत़ बुथ क्रमांक १० मधील ६५१ मतदारांच्या यादीतील २८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असला तरी त्यावरील मतमोजणी न्यायालयात याचिका दाखल झाल्यामुळे करण्यात आली नाही़ यावर २२ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. (प्रतिनिधी)
२८५ मते वगळून पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीची सरशी
By admin | Updated: April 19, 2016 01:18 IST