मोहन बोराडे, सेलूनगराध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर पडल्यामुळे नगरसेवकांच्या सहली अर्ध्याहून परतीच्या मार्गावर असल्यामुळे नगरसेवकांचा हिरमोड झाला आहे. २० जूनपर्यंत नगरपालिकेच्या नगराध्यक्षांची आगामी अडीच वर्षांसाठी निवड करण्यासाठी नगरसेवकांतून निवडणूक होणार होती. परंतु लोकसभा निवडणुकीत आघाडीचा राज्यात सफाया झाल्यामुळे राज्यातील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका सहा महिन्यांसाठी लांबणीवर पडणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे. नगराध्यक्षपदावर विराजमान होण्यासाठी अनेक जण इच्छुक होते. सेलूचे नगराध्यक्षपद ओबीसीसाठी राखीव झालेले आहे. त्यामुळे आ. रामप्रसाद बोर्डीकर गटाकडून गटनेते सुरेश कोरडे, नगरसेविका विमलबाई तरटे, पार्वतीबाई गोरे हे नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत. सेलू नगर- पालिकेत कॉँग्रेसचे १५ नगरसेवक आहेत तर शिवसेनेचे ५ व राष्ट्रवादी कॉग्रेसचा १ असे पक्षीय बलाबल आहे. गतवेळी आ. रामप्रसाद बोर्डीकर गटाचे पवन आडळकर हे शिवसेनेच्या पाठिंब्यावर नगराध्यक्ष झाले होते. विनोद बोराडे गटाकडे त्यावेळी ७ नगरसेवक होते. यावेळी बोराडे गटाकडून मारोती चव्हाण, वहिद अन्सारी यांच्या पत्नी हे दोघे नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत. आ. बोर्डीकर व बोराडे गटाकडून नगराध्यक्ष करण्यासाठी नगरसेवकांची फिल्डींग लावण्यात आली होती. त्यातच एका गटाचे काही मोजके नगरसेवक सहलीवर रवाना झाले असल्याची माहिती आहे. परंतु नगराध्यक्षपदाची निवडणूक सहा महिने लांबणीवर पडल्यामुळे सहलीवर गेलेले नगरसेवक परतीच्या मार्गावर आहे. लोकसभा निवडणुकीनंतर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची मोर्चेबांधणी दोन्ही गटांकडून करण्यात आली होती. सद्य:स्थितीत दोन्ही गटाकडून बहुमत असल्याचे दावे करण्यात आले आहेत. कॉँग्रेसमध्ये दोन गट पडल्यामुळे गतवेळीही बहुमत असतानाही शिवसेनेकडे उपनगराध्यक्षपद आले होते. यावेळीही शिवसेनाच किंगमेकरच्या भूमिकेत आहे. दरम्यान, नगराध्यक्षपदासाठी दोन्ही गटाकडून नगरसेवकांची मनधरणी सुरू होती. त्यातच ऐनवेळी धोका होऊ नये याची खबरदारी घेत एका गटाने काही मोजके सदस्य सहलीवर रवाना केले होते. ही निवडणूक लांबणीवर पडल्यामुळे विद्यमान नगराध्यक्षांचे चांगलेच फावले असले तरी इच्छुक मात्र हिरमुसले आहेत. शिवसेनेची भूमिका महत्त्वाची सेलू नगरपालिकेत कॉँग्रेसचे १५ नगरसेवक आहेत. मात्र कॉँग्रेसचे नगरसेवक आ. बोर्डीकर व माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे या दोन गटांत विभागले गेले होते. त्यामुळे गतवेळी शिवसेनेच्या पाठिंब्यावर पवन आडळकर नगराध्यक्षपदी विराजमान झाले होते. बोराडे गटाकडे ७ तर आ. बोर्डीकर गटाकडे ८ नगरसेवक त्यावेळी राहिले होते. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या माजी आ. हरिभाऊ लहाने यांनी लोकसभा निवडणुकीत सक्रीय सहभाग घेतला नाही. ते प्रचारातही दिसले नाहीत. यावेळी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांचा कल बोराडे गटाकडे असल्याचे काही दिवसांपासून चर्चिले जात आहे. परंतु निवडणूक लांबणीवर पडल्यामुळे सर्वच राजकीय चर्चा थांबल्या आहेत. नगरसेवकांसह इच्छुकांच्या मात्र उत्साहावर यामुळे पाणी फेरले आहे.
न.प.सदस्यांच्या सहली परतीवर
By admin | Updated: June 7, 2014 00:19 IST