मुखेड : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवून एकाच कुटुंबातील व्यक्तींना लाभ मिळवून देणाऱ्या चौकशी समितीवर कारवाई करावी व खोटे पंचनामे तयार करुन बनावट शेतकऱ्यांची यादी तयार करुन देण्यात येणारे अनुदान रोखावे या मागणीसाठी मौजे केरुर यथील शेतकरी व महिलांनी नायब तहसीलदार एस. एम. पांडे यांना घेराव घातला.राज्य शासनाने गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. गाव स्तरावर मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यकांच्या समितीतर्फे पंचनामे करण्यात आले. समितीने पंचनामे करतांना गावातील पुढाऱ्यांच्या सांगण्यावरुन मर्जीतील शेतकऱ्यांची गारपिटग्रस्ताच्या यादीत नाव समाविष्ट केल्याने गारपीटीने पिकाचे नुकसान झालेले शेतकरी वंचित राहिले. खऱ्या नुकसानग्रस्ताऐवजी वेगळ्याच व्यक्तीचे नाव गारपीटाच्या यादीत समाविष्ट करण्यात येवून मावेजा वाटप केला जात असल्याने केरुर येथील शंभर शेतकरी व महिलांनी तहसीलवर धडकल्या़ गारपीटग्रस्तांना वगळून बनावट शेतकऱ्यांना वाटप करण्यात येत असलेला मावेजा देण्यात येवू नये अशी तक्रार केली असता नायगाव तहसीलदार एस. एम. पांडे यांनी तक्रार स्विकारण्यास नकार दिल्याने शेतकऱ्यांनी पांडे यांना घेराव घातला व तक्रार अर्ज स्विकारेपर्यंत हलणार नसल्याचे सांगत ठिय्या केला. यावेळी शिवाजी गेडेवाड, भाजपाचे माधव बनसोडे, शिवसेनेचे कैलास मेहरकर, युवा सेनेचे नागनाथ लोखंडे उपस्थित होते. यावेळी पोलिस निरीक्षक संदीपान शेळके यांनी मध्यस्थी केल्याने प्रकरण निवळले़ (वार्ताहर)
नायब तहसीलदारांना महिलांचा घेराव
By admin | Updated: June 25, 2014 00:38 IST