पिशोर : कन्नड तालुक्यातील आमदाबाद येथे नवरीला घेऊन जाण्यासाठी सज्ज असलेल्या नवरदेवाच्या कारखाली चिरडून पाचवर्षीय चिमुरडीचा करुण अंत झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. घटनेनंतर संतप्त गावक ऱ्यांनी ही कार पेटवून दिली. वैशाली काकडे (रा.कोटनांद्रा, ता. सिल्लोड) असे मृत चिमुरडीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, कन्नड तालुक्यातील देभेगाव येथील कारभारी बोडखे यांच्या मुलाचा लग्न सोहळा आमदाबाद येथे दुपारी पार पडला. लग्नानंतर सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास नवरदेवाची कार मंडपाजवळ लावण्यात आली होती. वऱ्हाडासोबत वधूची रवानगी करण्यासाठी नातेवाईक जमलेले होते. याप्रसंगी कारचालक बंडू वामन जिते (रा. देभेगाव, ता. कन्नड) याने नवरदेव-नवरीला कारमध्ये बसविण्यासाठी जीप पुढे घेतली. जीपसमोरच पाचवर्षीय वैशाली बसलेली होती. कारचालकास ती दिसली नाही. त्याने वेगात कार पुढे नेल्याने हा भीषण अपघात घडला. याप्रसंगी उपस्थितांना काही कळण्याच्या आत कारचे समोरील चाक वैशालीच्या डोक्यावरून गेले. या घटनेत ती जागीच ठार झाली. गावकऱ्यांनी जीपचालकास चोप दिला. नवरदेवाची ही कार क्रमांक (एम.एच.०६ एबी. ६६०४) पेटवून दिली. पिशोर पोलीस ठाण्याचे सपोनि अभिजित मोरे, उपनिरीक्षक जयराज भटकर, जमादार उबाळे, पो.कॉ. किसन गवळी, देशमुख, संजय पवार, दयानंद वाघ, गाडेकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
नवरदेवाच्या कारने मुलीस चिरडले!
By admin | Updated: April 30, 2016 00:06 IST