उस्मानाबाद : सन २०१३ मध्ये मंजूर झालेल्या वाशी येथील ट्रोमा केअर, बेंबळी व शिराढोण येथील ग्रामीण रूग्णालयासह तीन प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि १४ आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामाची प्रक्रिया प्रशासकीय ‘लालफितीत’ अडकली आहे़ मंजुरीला दोन वर्षांचा कालावधी लोटला तरी अद्यापही बांधकामासाठी निधी मिळालेला नाही़ त्यामुळे रूग्णालयांचे बांधकाम होणार कधी आणि रूग्णांना सेवा मिळणार कधी ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ याशिवाय नव्याने मंजूर झालेल्या आरोग्य उपकेंद्रांची अवस्थाही अशीच आहे़ जिल्हा रूग्णालयापासून ते जिल्ह्यातील उपकेंद्रापर्यंत सर्वच ठिकाणी अपुरे कर्मचारी, अपुऱ्या सुविधांमुळे रूग्णांची मोठी गैरसोय होत आहे़ ही गैरसोय कमी करण्याच्या हेतूने सन २००१ च्या जनजनगणनेनुसार जिल्ह्यातील काही गावांमध्ये नवीन रूग्णालयांना मंजुरी देण्यात आली होती़ याबाबत १७ जानेवारी २०१३ रोजी परिपत्रक काढण्यात आले होते़ उस्मानाबाद जिल्ह्यात वाशी येथे ट्रोमा केअर, कळंब तालुक्यातील शिराढोण व उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी येथे ग्रामीण रूग्णालय, वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे व उमरगा तालुक्यातील डिग्गी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि परंडा तालुक्यातील रूई, आरणगाव, भूम तालुक्यातील वाकवड, कळाब तालुक्यातील नायगाव, रांजणी, भाटशिरपुरा, नागझरवाडी उस्मानाबाद तालुक्यातील तुगाव, जवळा, शेकापूर, सोनेगाव, तावरजखेडा, तुळजापूर तालुक्यातील फुलवाडी, निलेगाव, वानेगाव, दहिवाडी, लोहारा तालुक्यातील सास्तूर, उमरगा तालुक्यातील रामपूर, काळदेव निंबाळा, नाईकनगर, वाघदरी या १४ ठिकाणी नवीन आरोग्य उपकेंद्रांना मंजुरी देण्यात आली होती़वाशी येथील ग्रामीण रूग्णालयात सोलापूर- औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अपघातग्रस्तांसह परिसरातील शेकडो रूग्ण उपचारासाठी येतात़ अपघाताची आणि उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांची संख्या वाढल्याने रूग्णांची गैरसोय होताना दिसत आहे़ शिवाय शिराढोण, बेंबळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांवरही रूग्णांचा भार वाढला आहे़ येथे अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने रूग्णांची गैरसोय कायम आहे़ या ठिकाणी ट्रोमा केअर, ग्रामीण रूग्णालयांना मंजुरी मिळून दोन वर्षाहून अधिक कालावधी लोटला आहे़ प्रारंभी या रूग्णालयांच्या बांधकामाबाबत इस्टिमेंट पाठविण्यात आले होते़ मात्र, त्यानंतर नवीन ‘डीएसआर’ नुसार प्रस्ताव पाठविण्याचे वरिष्ठस्तरावरून सांगण्यात आले़ त्यानंतर आता ही प्रक्रिया सुरू असून, त्याला प्रशासकीय मंजुरी मिळणार कधी आणि निधी प्राप्त होणार कधी ? आणि रूग्णालय खऱ्या अर्थाने सुरू होणार कधी ? असे एक ना अनेक प्रश्न समोर येवू लागले आहेत़ (प्रतिनिधी) सन २०१३ मध्ये मंजूर झालेल्या नवीन रूग्णालयापैकी बेंबळी, शिराढोण येथील ग्रामीण रूग्णालयाच्या इस्टिमेंटची प्रक्रिया सुरू आहे़ तर डिग्गी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामाबाबतची टेंडर प्रक्रिया सुरू आहे़ याशिवाय २२ पैकी ७ उपकेंद्राच्या बांधकामाचीही प्रक्रिया सुरू आहे़ पाच वर्षांत ही कामे पूर्ण होणे अपेक्षित असून, प्रशासनस्तरावरून आवश्यक तो पाठपुरावा वरिष्ठांकडे करण्यात येत असल्याची माहिती एनआरएचएमचे उपअभियंता एस़बीक़वडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़सन २०१३ मध्ये जिल्ह्यात नव्याने काही रूग्णालयांना मंजुरी मिळाल्यानंतर येथील लोकप्रतिनिधींनी आपल्या पाठपुराव्यामुळे या रूग्णालयांना मंजुरी मिळाल्याचा वेळोवेळी दावा केला होता़ मात्र, ही कामे दोन वर्षांनंतरही रखडली आहेत. त्यामुळे आता या लोकप्रतिनिधींनी निधीची उपलब्धता व्हावी, प्रशासकीय यंत्रणा जोमात कामाला लागावी, यासाठीही पाठपुरावा करणे अवश्यक आहे़४जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून सुदैैवाने राज्याचे आरोग्य मंत्री डॉ़ दीपक सावंत हे लाभले आहेत़ त्यामुळे डॉ़ सावंत यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी नव्याने मंजूर झालेल्या या रुग्णालयांच्या इमारती लवकरात लवकर उभ्या राहव्यात यासाठी निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने तसेच प्रशासकीय कामकाजाला गती यावी आणि रूग्णांना सेवा मिळावी, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे़
नवी रु ग्णालये ‘लालफितीत’
By admin | Updated: December 8, 2015 00:05 IST