बोरी : जिंतूर- परभणी महामार्गावरील बोरी बसस्थानकावर मोठमोठे खड्डे पडले आहेत़ या खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने वाहन चालकांना वाहन चालविणे अवघड झाले आहे़ तसेच प्रवाशांना बसमध्ये चढताना व उतरताना तारेवरची कसरत करावी लागत आहे़ या महामार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून होत आहे़ मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे़ जिंतूर- परभणी राज्य महामार्गावर बोरी हे गाव वसलेले आहे़ या गावाची लोकसंख्या २० हजारांच्या जवळपास आहे़ जवळपासच्या ३० ते ४० गावांचा व्यवहार बोरी बाजारपेठेवर अवलंबून आहे़ त्यामुळे या ठिकाणी प्रवाशांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते़ चार-पाच महिन्यांपासून बोरी बसस्थानकावरील महामार्गाची दुरवस्था झाली आहे़ या महामार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत़ त्यामुळे पावसाचे पाणी या खड्डयामध्ये साचत आहे़ वाहन चालकांना वाहन चालविताना अडचणींचा सामना करावा लागत आहे़ तसेच प्रवाशांचीही या चिखलामुळे गैरसोय होत आहे़ सार्वजनिक बांधकाम विभागाने या महामार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या सरपंच चंद्रकलाबाई कनकुटे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे़ (वार्ताहर)दुचाकीस्वार जखमीबोरी बसस्थानकावरील महामार्गावर पाण्याचे डबके साचल्यामुळे दुचाकीस्वार खाली पडून जखमी होत आहेत़ एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर साबां विभागाला जाग येते की काय असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे़ अधिकारी व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे़
बसस्थानकाला तळ्याचे स्वरूप
By admin | Updated: July 28, 2014 00:52 IST