वाशी : येथील पंचायत समितीच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेला प्रत्येकी दोन जागा मिळाल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे़ सभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू असून, काँग्रेस ज्या पक्षाला पाठींबा देईल त्याचाच उमेदवार सभापतीपदावर विराजमान होणार आहेत़वाशी पंचायत समितीमध्ये सहा सदस्य आहेत. तालुक्यातील मतदारांनी काँग्रेस-२, शिवसेना-२ व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे २ असे सहा सदस्य पंचायत समिती निवडणुकीत विजयी केले़ भारतीय जनता पक्षाला मात्र, पंचायत समितीमध्ये प्रवेश मिळालेला नाही. यापूर्वी पंचायत समितीच्या सभापती काँग्रेसच्या मनिषा घोलप होत्या़ त्यांचा निवडणुकीत पराभव झालेला आहे. पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित आहे. तेरखेडा पंचायत समितीच्या तेरखेडा गणातून शिवसेनेच्या रूपाली घोलप व पारगाव गणातून सविता विकास तळेकर विजयी झालेल्या आहेत़ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरमकुंडी गणातून भाग्यश्री हनुमंत हाके या निवडून आलेल्या आहेत. काँग्रेस पक्षाकडे एकही महिला सदस्या निवडून आलेली नाही. काँग्रेस पक्षाकडे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सत्तास्थापनेसाठी हात पुढे केला आहे़ त्यामुळे काँग्रेस कोणासोबत जाणार ? याकडे अनेकांचे लक्ष आहे़ काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष प्रशांत चेडे यांच्याकडे यासंदर्भात विचारणा केली असता जिल्हास्तरीय पक्षश्रेष्ठींशी विचारविनिमय करून निर्णय घेणार असल्याचे सांगत अधिक माहिती देण्याचे त्यांनी टाळले़ पारगाव येथील शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याने प्रशांत चेडे यांच्यावर अनेक आरोप केल्याने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा शिवसेनेबरोबर जाण्यास विरोध असल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बिभीषण खामकर असून, तेरखेडा गणातून त्यांच्या नातलग मनीषा घोलप यांना पराभव पत्करावा लागलेला आहे. काँग्रेस पक्षातीलच विकासोचे माजी चेअरमन बाबूराव घुले यांच्यावर अविश्वास ठराव आणून त्यांना पायउतार व्हावे लागले होते. तेव्हापासून तेरखेडा येथे काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले होते. त्याचा फ टका जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत बसला असून काँगे्रसच्या गडाला शिवसेनेने सुरूंग लावला. तेरखेडा पंचायत समिती गण शिवसेनेकडे तर इंदापूर पंचायत समिती गण राष्ट्रवादी काँगेसने खेचून घेतला. इंदापूर गणातून राष्ट्रवादीचे रमेश पाटील अवघ्या चार मतांनी विजयी झाले आहेत. (वार्ताहर)
वाशी येथे राष्ट्रवादी-सेनेत रस्सीखेच
By admin | Updated: March 4, 2017 00:30 IST