परभणी : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत उच्च रक्तदाब, मधुमेह व कॅन्सर अशा गंभीर आजाराचे निदान व उपचार करण्यात येणार आहे़ या कार्यक्रमाची जिल्ह्यामध्ये लवकरच सुरूवात होणार असल्याची माहिती राज्यमंत्री फौजिया खान यांनी दिली़या कार्यक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयात उच्च रक्तदाबाचे, मधुमेह व कॅन्सरवरील रुग्णांवर विशेष उपचार होणार आहेत़ त्याचप्रमाणे जीवनशैलीशी व आहाराशी निगडीत आजार असल्यामुळे समुपदेशन व आहाराचा सल्ला दिला जाणार आहे़ या कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना वैद्यकीय महाविद्यालयात विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे़ या कार्यक्रमामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह यासारख्या रुग्णांवर लवकर निदान होऊन उपचार होणार आहेत़ परिणामी भविष्यात निर्माण होणारे हृदय रुग्ण, पक्षाघाताचे रुग्ण कमी होऊन मृत्यूच्या संख्येत घट होणार आहे़ हा कार्यक्रम परभणी जिल्ह्याला मंजूर करून घेण्यासाठी राज्यमंत्री फौजिया खान यांनी वारंवार पाठपुरावा केला होता़ या कार्यक्रमांतर्गत जिल्हा व तालुकास्तरावर ४१ कंत्राटी पदे भरण्यास मंजुरी मिळाली आहे़ यात वैद्यकीय अधिकारी, भीषक, अधिपरिचारिका, समुपदेशक या पदांचा समावेश आहे़ (प्रतिनिधी)या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी साहित्य, सामग्री व औषधीसाठी यावर्षीच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान कृती आराखड्यास पुरेसे अनुदान उपलब्ध करून घेण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे राज्यमंत्री फौजिया खान यांनी सांगितले़
परभणी जिल्ह्यात राष्ट्रीय असंसर्ग रोग नियंत्रण कार्यक्रम लवकरच
By admin | Updated: July 2, 2014 00:16 IST