पैठण : नाथ सागराच्या अप्रोच कॅ नॉल परिसरात रविवारी (दि.३) वनखात्याने सोडलेली महाकाय मगर मुक्त विहार करताना आढळून आली. मगरीच्या अस्तित्वाने मच्छीमार, शेतकरी, धरणकाठच्या गावांतील नागरिक, पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे़ या मगरीला समुद्रात नेऊन सोडावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांसह मच्छीमारांनी केली आहे.सकाळी १० वाजेदरम्यान जालना पाणीपुरवठा पंप हाऊस परिसरात या महाकाय मगरीचे दर्शन स्थानिक मच्छीमार बजरंग लिंबोरे यांच्यासह अनेक नागरिकांना झाले़ त्यांनी ताबडतोब ही बाब सर्व मच्छीमारांना व गावकऱ्यांना सांगितली. ही माहिती होताच सर्व मच्छीमार पाण्याच्या बाहेर पडले़ पाणीपुरवठा विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याबाबत कल्पना देऊन सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या. ही मगर परिसरात सायंकाळी ६ वाजेपर्यंत अधूनमधून दिसत होती. अर्धा अर्धा तास मगर उन्हात बसून, पुन्हा पाण्यात जात होती़ या मगरीच्या भीतीमुळे मच्छीमार दिवसभर पाण्यात उतरू शकले नाहीत. मगरीच्या भीतीने पाण्यात टाकलेले जाळेही मच्छीमारांनी बाहेर काढले नाही. यामुळे मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती आहे.परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील कान्हेगाव येथे वनखात्याने ही मगर सप्टेंबरमध्ये पकडून मध्यरात्रीच्या सुमारास जायकवाडी प्रशासनाची कुठलीही परवानगी न घेता जायकवाडीच्या अप्रोच कॅनॉलमध्ये सोडली होती.
नाथ सागरात पुन्हा अवतरली मगर
By admin | Updated: January 4, 2016 00:23 IST