औरंगाबाद : महापालिकेने शहरातील नालेसफाईचा फ ज्जा उडविला आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सफाईचे काम उशिरा सुरू झाले. ३ कोटींच्या खर्चातून नालेसफाई केली जात आहे. ४० टक्के नालेसफाई झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. लोकमतने नालेसफाई पाहणीचा आढावा घेतला असता भयावह वास्तव समोर आले आहे. गांधीनगर, जाफरगेट, शंभूनगर, प्रतापनगर या भागांतील नाल्यांची सफाई करण्यासाठी मनपा पुढे आलेली नाही. नालेसफाईसाठी पाहिजे तशी यंत्रणा अजूनपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात आपत्तीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. काही अधिकारी निवडणुकीच्या कामातच आहेत, तर जे पालिकेत आहेत, ते नालेसफाईकडे गांभीर्याने पाहत नाहीत. पावसाळ्यात नालेसफाई होणे क्रमप्राप्त आहे. साफसफाईकडे घनकचरा विभागाने लक्ष द्यावे. यासाठी आरोग्य विभागाने गेल्या महिन्यातच पत्र दिले आहे. साथरोगांसाठी धोकादायक असलेल्या १४६ ठिकाणांची यादीदेखील विभागाने दिली आहे. शहरात ६६ कि़मी. लांबीचे नाले आहेत. नाल्यामधील गाळ, कचरा व अतिक्रमणे तशीच आहेत. अजूनही पालिकेने त्याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. ४० टक्के नालेसफाईचा दावा नालेसफाईकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने अडीच हजार घरांना दरवर्षी नाल्याच्या बॅकवॉटरचा फटका बसतो. मान्सून सुरू झाला आहे. या काळात ६६ कि़मी. लांबी असलेले नाले पालिका कसे स्वच्छ करणार, हा प्रश्न आहे. आजपर्यंतच्या पावसाने थोड्याफार प्रमाणात कचरा वाहून गेला आहे. त्यावरच ४० टक्के सफाईचा दावा पलिकेने केला आहे. पालिकेचे पथक त्यालाच नालेसफाई समजून कंत्राटदारांना बिले अदा करण्याची शंका आहे.मनपा प्रशासनाचे मतसफाईसाठी वॉर्ड अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार मजूर वाढविले जात असल्याचे घनकचरा व्यवस्थापक तथा उपायुक्त रवींद्र निकम यांनी सांगितले. कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे म्हणाले, रिक्षा, ट्रक, ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सभापती म्हणालेनालेसफाईचा आढावा घेतला आहे. सहा प्रभागांतील नाले वेळेत स्वच्छ व्हावेत. यासाठी प्रशासनाला आदेश दिले आहेत, असे सभापती विजय वाघचौरे यांनी सांगितले.
नालेसफाईचा फज्जा!
By admin | Updated: June 21, 2014 01:00 IST