उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील जिल्हा परिषद प्रशालेत दहावी परीक्षेचे केंद्र आहे. शनिवारी इंग्रजी विषयाच्या पेपरला सुरुवात होताच केंद्राबाहेर उपस्थित असलेल्या जमावाला हुसकावून लावत असताना काहीजणांनी खिडक्यांवर दगडफेक केली. हा प्रकार लक्षात येताच परीक्षा केंद्रातील कर्मचाऱ्यांनी थेट शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. शिक्षणाधिकाऱ्यांनी सदरील प्रकार पोलीस अधीक्षकांच्या कानावर घातला असता तातडीने दखल घेत पोलीस अधीक्षकांनी जास्तीचे कर्मचारी केंद्रावर तैनात केले. त्यानंतर परीक्षा सुरळीत पार पडली. खिडक्यांना लोखंडी जाळी असल्याने परीक्षार्थिंना कसल्याही स्वरूपाची इजा झाली नाही. दहावीच्या परीक्षेला ७ मार्चपासून सुरुवात झाली आहे. शनिवारी इंग्रजी विषयाचा पेपर होता. नळदुर्ग येथील जि. प. प्रशालेच्या केंद्रावर सकाळी ११ वाजता परीक्षेला सुरुवात झाली. परीक्षा सुरळीत सुरू असतानाच दुपारी एक वाजेच्या सुमारास परीक्षा केंद्राच्या परिसरात जमाव जमला. या जमावाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला असता, जमावातील काही जणांनी थेट इमारतीच्या खिडक्यांवर दगडफेक केली. या प्रकारामुळे भयभीत झालेल्या केंद्रातील काही कर्मचाऱ्यांनी शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे यांना कल्पना दिली. त्यावर खबरदारीची बाब म्हणून उकिरडे यांनी हा प्रकार पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या कानावर घातला. याची दखल घेत देशमुख यांनी तेथे जास्तीचे पोलीस कर्मचारी पाठविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांनी परीक्षा केंद्रावर जावून जमावाला केंद्र परिसरातून हुसकावून लावले. त्यानंतर जवळपास एक तास हे कर्मचारी केंद्र परिसरात तळ ठोकून होते. खिडक्यांना लोखंडी जाळ्या बसविण्यात आलेल्या असल्याने परीक्षार्थिंना कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नाही. (प्रतिनिधी)
नळदुर्ग परीक्षा केंद्रावर दगडफेक !
By admin | Updated: March 11, 2017 23:42 IST