विहामांडवा : पैठण तालुक्यातील विहामांडवा हे स्व.शंकरराव चव्हाण यांची जन्मभूमी असल्याने, या भूमीशी माझे भावनिक नाते आहे. पैठण तालुक्याच्या विकासासाठी माझी कायमच सकारात्मक भूमिका राहिली आहे. या भूमीचे मी आभार मानण्यासाठी मी आलो आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
विहामांडवा, तूळजापूर, डोणगाव या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन मंत्री चव्हाण यांच्या हस्ते विहामांडवा येथे झाले. याप्रसंगी गावकऱ्यांनी केलेल्या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. कार्यक्रमाला रोहयो मंत्री संदीपान भुमरे, जि.प. अध्यक्षा मीना शेळके, माजी मंत्री अनिल पटेल, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.कल्याण काळे, माजी आमदार संजय वाघचौरे, विलास भुमरे, विलास औताडे, रवींद्र काळे, ज्ञानेश्वर कापसे, नामदेव पवार, विनोद तांबे यांची उपस्थिती होती.
तुळजापूर ते डोणगाव या रस्त्यासाठी ३७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, तर हा रस्ता सिमेंटचा करा, त्यासाठी आणखी निधी लागला, तर देऊ, अशी घोषणा मंत्री चव्हाण यांनी केली. त्यानंतर, मंत्री संदीपान भुमरे यांनी पैठण तालुक्यातील प्रस्तावित विकासकामांची माहिती दिली. गावकऱ्यांसह बांधकाम विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.