औरंगाबाद : एखाद्या गोष्टीचा मनापासून ध्यास घेतला की, ती व्यक्ती स्वस्थ बसू शकत नाही. कोवळ्या वयात बाबूराव यांच्या कानी रेडिओवरून बासरीचे सूर पडले आणि कायमचे मनात घर करून गेले. आयुष्यात घेतला गेलेला प्रत्येक श्वास बासरीचा सूर बनून बाहेर पडावा, असे त्यांनी ठरवले. तेव्हापासून सुरू झालेल्या या सूरमय प्रवासात आज साठ वर्षांनंतरही संगीतरत्न बाबूराव दुधगावकरांनी मुखापासून बासरी वेगळी केली नाही.सुरकुतलेल्या पापण्यांत डोळे मिटून बाबूराव सांगतात की, ‘नववीत असताना रेडिओवर बासरीवादनाचा एक कार्यक्रम प्रसारित व्हायचा. त्या मधुर स्वरांत जणू काही मला जगण्याची दिशा मिळाली. माझ्यासाठी बासरी जादूची काडी होती. केवळ फुंकर मारून इतक ा गोड आवाज कसा काय निघतो हे शिकण्याची ओढ मला शांत बसू देईना; पण तो काळ होता १९५२ चा. मी राहायचो परभणीला. त्यावेळी मला कोणीच गुरू मिळाला नाही.’ मात्र, शिकण्याला गुरूची नाही तर दुर्दम्य इच्छाशक्तीची गरज असते. कृष्णाच्या मूर्तीसमोर एकलव्याचा आदर्श घेत त्यांनी रोज तासन्तास सराव करीत बासरीवादनाचे धडे गिरवले. पुढे तहसीलदार होऊनदेखील सराव चालूच ठेवला. ‘बासरी माझ्यासाठी ईश्वराशी एकरूप होण्यासाठी केलेली साधना आहे. त्यात कसा काय खंड पडू देऊ?’ असा सवाल विचारताना उमटणारे त्यांच्या चेहऱ्यावरील हसू सर्व काही सांगून जाते.सन १९९४ साली सेवानिवृत्तीनंतर हजारो कार्यक्रमांतून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी आपली कला सादर केली. अनेक थोरामोठ्यांचे आशीर्वाद आणि शाबासकी मिळवली; पण या सर्व कौतुकात संगीत तपश्चर्येचे नि:स्वार्थ व्रत त्यांनी सोडले नाही. ते अभिमानाने सांगतात की, ‘माझे सगळे आयुष्यच एक मैफील म्हणून मी जगलो. मला अनेक आयोजक मानधन घेण्यासाठी आग्रह करतात; पण जेथे पैशाचा दर्प लागतो तेथे संगीताचे आध्यात्म्य संपते. निसर्गाने आशीर्वाद म्हणून दिलेल्या या कलेचा बाजार करणे मला पटत नाही. मनापासून दिलेली रसिकांची दाद माझ्यासाठी सर्वस्व आहे.’ मानधन तर सोडाच; ते येण्या-जाण्याचा खर्चदेखील घेत नाहीत.
बासरीवादकाची नि:स्वार्थ संगीत तपश्चर्या
By admin | Updated: May 12, 2015 00:53 IST