औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत असंख्य रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळविणे कठीण झाले होते. आगामी तीन ते चार महिन्यांनंतर कोरोनाची तिसरी लाट येईल, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. या लाटेची शक्यता लक्षात घेता चिकलठाणा येथील गरवारे कंपनीच्या शेडमध्ये कंपनीच्या वतीने दीडशे ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहे.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिकुमार पाण्डेय यांनी सोमवारी या कोविड सेंटरच्या शेडची पाहणी केली. ऑक्सिजन पुरवठा करणारी यंत्रणा येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोविड सेंटरसाठी गरवारे कंपनीचे शेड उपयुक्त असल्याचे आयुक्त पाण्डेय यांनी सांगितले. पाहणीदरम्यान त्यांनी काही सूचनाही दिल्या. यावेळी उद्योगपती उल्हास गवळी, पालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोंबे, आदींची उपस्थिती होती.