छत्रपती संभाजीनगर : मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वेचा प्रस्ताव तीन वर्षांपासून गुलदस्त्यातच आहे. जिल्ह्यात हायस्पीड रेल्वेचा १११ किलोमीटर ट्रॅक समृद्धी महामार्गालगत बांधणीचा विचार होऊन तीन वर्षे झाली. नॅशनल हायस्पीड रेल्वे काॅर्पोरेशन लिमिटेडकडे (एनएचआरसीएल) यासाठी डीपीआर करणार होते. या प्रकल्पांतर्गत पर्यावरण संवर्धन, सामाजिक परिणाम, भूसंपादन प्रक्रिया, रेल्वेचा थांबा, मिळणारा मावेजा इ. विषयांवर अधिकारी, नागरिक, शेतकऱ्यांशी एमजीएमच्या सभागृहामध्ये चर्चा झाली होती.
या प्रकल्पासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर ऑफिसही सुरू करण्यात आले हाेते. आता ते कार्यालय निवडणूक आचारसंहिता कामासाठी वापरले गेले. एनएचआरसीएलच्या संकेतस्थळावर प्रस्तावित प्रकल्पांमध्ये सध्या या मार्गासाठी डीपीआर, अंदाजपत्रकाबाबत कुठेही उल्लेख नसल्याचे आढळून आले. या प्रकल्पासाठी लिडार सर्व्हे २०२१ मध्ये करण्यात आला असून पुढे काहीही हालचाली झाल्या नाहीत. भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनाला देखील अद्याप काहीही सूचना नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
हायस्पीड रेल्वेचा प्रस्तावित प्रकल्प असा होताएकूण लांबी : ७४९ किलोमीटरकिती स्थानके? : १२किती जिल्हे जोडणार? : १०भूसंपादन किती? : १२४५.६१ हेक्टररेल्वेचा ताशी वेग किती? : ३३० ते ३५० कि.मी.प्रवासी वाहतूक क्षमता : ७५०एकूण किती बोगदे? : १५, लांबी : २५.२३ कि. मी.समृद्धी महामार्गालगत १७.५ मीटर रुंदीचा मार्ग
या ठिकाणी रेल्वे स्टेशन...अजनी, खापरी, वर्धा, पुलगाव, कारंजा लाड, मालेगाव जहाँगीर, मेहकर, जालना, छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, नाशिक, घोटी बुद्रूक, शहापूर, ठाणे या १४ ठिकाणी एचएसआर स्टेशन बांधणे प्रस्तावित होते.
किती भूसंपादन करावे लागेल?३ तालुक्यांतील ४९ गावांलगत १११ कि.मी. अंतरातून हायस्पीड रेल्वेचा मार्ग प्रस्तावित आहे. यासाठी जिल्ह्यातून १६७.९६ हेक्टर जमीन संपादित करावी लागेल. त्यात ७३.७३ हेक्टर जमीन खाजगी तर ९४.२२ हेक्टर जमीन सरकारी असेल. सरकारी २०१ तर ४१० खाजगी भूखंड संपादित करावे लागतील. तालुक्यातील २३ गावांतील ६१.९४ हेक्टर, गंगापूरमधील ११ गावांतील ३७.१० तर वैजापूरमधील १५ गावांतील ६७.९० हेक्टर भूसंपादन करावे लागणार आहे.