राजेश खराडे , बीडविभागात सध्या कृषी पंप जोडणीची कामे सुरू आहेत. याकरिता सिमेंट विद्युत पोलची कमतरता भासत असल्याने अनेक ठिकाणची कामे रखडली आहेत; मात्र येथील प्रबलित सिमेंट पोलच्या कारखान्यात जिल्ह्यातील संपूर्ण कृषी पंपाची जोडणी होईल एवढे सिमेंट पोल उपलब्ध असतानाही याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे.दुर्गम भागातील शेतकऱ्यांना कृषी पंप जोडणीच्या प्रवाहात आणण्यासाठी विभागात सध्या विशेष मोहीम सुरू आहे. याकरिता आवश्यक असणाऱ्या साहित्याची पूर्तता करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारावर सोपविण्यात आली आहे. कामे करण्यासाठी सिमेंट पोलची कमतरता असल्याचे कारण पुढे करीत अनेक ठिकाणची कामे रखडली आहेत. किंबहुना काही कामे सुरूही झाली नाहीत.बीड विभागीय कार्यालयालगत असणाऱ्या प्रबलित सिमेंट पोलच्या कारखान्यात पोल उपलब्ध असूनदेखील मुख्य कार्यालयाच्या परवानगीशिवाय ते देता येत नाहीत, शिवाय कंत्राटदारांना देण्यात आलेल्या निविदांमध्ये सिमेंट पोलची पूर्तता संबंधित कंत्राटदारानेच करणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे मुख्य कार्यालय स्तरावरच निर्णय होणे गरजेचे आहे.गत आठवड्यात राज्याचे कार्यकारी संचालक सी.एच. एरमे यांनी कृषी पंप वीज जोडणी संदर्भात बैठक घेतली होती. दरम्यान, संबंधित कारखान्यातील सिमेंट पोल वापरण्यात यावेत, अशा सूचनाही त्यांनी मुख्य अभियंता, तसेच येथील अधीक्षक अभियंता यांना दिल्या होता; मात्र त्याची अंमलबजावणी झाल्याचे अद्याप तरी दिसून येत नाही.उलटार्थी येथील कारखान्याला साहित्याची उणीव भासून तो कारखाना बंद पडण्याच्या मार्गावर आहे. कारखान्यात दिवसअखेर ९६ पोल तयार होण्याची क्षमता असून, साहित्य पुरवल्यास वर्षाला २४ हजार पोल हा कारखाना बनवू शकतो.
महावितरणचे सिमेंट पोलकडे दुर्लक्ष
By admin | Updated: March 29, 2016 00:48 IST