ऐन दिवाळीत शेतकरी संकटात : भाजीपाला, धान उत्पादकांची पीक धोक्यातपालांदूर : परिसरातील सुमारे १,१०० शेतकऱ्यांवर महावितरणने वीज कपात करून ऐन दिवाळीत संकट ओढवले आहे. थकीत वीज बिलाची बाब पुढे करीत कालपासून कृषी जनित्र बंद केल्याने आज सकाळी सिंचनाकरिता कृषीपंपाला वीजच नाही. त्यामुळे वीज कार्यालयात तक्रारीकरिता गेले असता वीज मुद्दामच कापल्याचे कळले.शासनाच्या तुघलकी धोरणाने खरच शेतकरी बेजार झाला आहे. सगळ्या बारा भानगडीचा भागीदार शेतकऱ्यांनाच केल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सध्यस्थितीत धान कापणी, बांधणी, मळणीचा हंगाम जोमात सुरु आहे. रब्बीकरिता जमीन तयार करून पाणी देणे अगत्याचे आहे. बागायतीत प्रत्येक दिवशी पाणी भाज्यांना गरजेचे आहे. अशावेळी वीज कापून महावितरणने शेतकऱ्यांना संकटाचा खाईत ढकलले आहे. धान विक्रीकरिता तयार आहेत. पण हमीभाव केंद्र पालांदुरात सुरु न झाल्याने धान पडून आहेत. खासगीत १,३०० - १,३५० रुपये भावाने खरेदी सुरु आहे. दिवाळीत तात्पुरत्या गरजेकरिता १०, ५ पोती धान खासगीत विकून दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न सुरु असताना मध्येच महावितरणने वीज बिलाचा भरणा करण्याचे सांगितले. त्यामुळे दिवाळीच्या आनंदावर विरजण पडले आहे. नियमित मिटर रिडींग न घेणे, अव्वाच्या सव्वा बिल देणे, राजकारण्यांकडून वीज बिल माफ करण्याचे खोटे बोलणे, मागील ३ वर्षाचे दुष्काळ डोक्यावर असणे, शेतीमालाचा भाव नसणे आदी कारणाने शेतकरी नियमित वीज बिल भरत नाही. ही वास्तविकता शासनाला प्रामाणिकपणे जाण असूनही वीज कापू देणे म्हणजे पाठीत खंजीर खुपसण्यासारखेच झाले. उद्योगधंद्यांना वीज माफक व पुरेशी पुरविली जातो. प्रसंगी वीज बिल, कर्ज माफ केल्या जाते. मग शेतकऱ्यांना का नाही? असा प्रश्न देशाचा आधारस्तंभ असलेला शेतकरी विचारतो आहे. इंडिया डिजीटल करिता कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. पण ज्याच्या भरोशावर आर्थिक डोलारा उभा आहे. त्याच्या सन्मानाकरिता साधे वीज बिल माफ करण्याची मानसिकता शासनात नाही का?, शेतकऱ्यांच्या मेहनतीवर प्रशासनावर ८१ टक्के उत्पन्नाचा खर्च केला जातो. यात थोडी वाढ करून वीज बिल भरले तर काय बिघडेल, असा संतप्त सवालही शेतकऱ्यांनी केला आहे. लोकप्रतिनिधींनी तात्काळ महावितरणशी संपर्क करून वीज नियमित करण्याचे प्रयत्न करावे अशी मागणी आहे. (वार्ताहर)शेतकऱ्यांकडे २००९-१० पासूनची वीज बिले थकीत आहेत. हे व्यापारीदृष्ट्या न पटणारे आहे. प्रत्येक हंगामात 'फुल नाही फुलाची पाकळी' समजून काही रक्कम वीज बिलापोटी भरली असती तर आज ही स्थिती आलीच नसती. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने वीज कापली आहे. आजही थकीत रकमेतील काही रक्कम भरली गेली तर वीज पुरवठा पूर्ववत करता येईल. महावितरणशी शेतकऱ्यांनी मैत्री करावी. जमेल तेवढी रक्कम भरून कंपनीला सहकार्य करा.-पंकज आखाडे, अभियंता, महावितरण पालांदूर (चौ.)
महावितरणने कापली शेतकऱ्यांची वीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2016 00:42 IST