याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पडेगाव येथील रहिवासी तक्रारदार यांच्या घरातील वीज मीटर नादुरुस्त झाले होते. त्यांच्या घरी वीज मीटर वाचन करण्यासाठी चव्हाण आला होता. तेव्हा त्यांनी त्याला वीज मीटर बदलून हवे असल्याचे सांगितले. याकरिता अडीच हजार रुपये लाच त्याने मागितली. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे त्याची तक्रार केली. पोलीस निरीक्षक शुभांगी सूर्यवंशी यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पडेगाव येथील तक्रारदार यांच्या घराच्या परिसरात सापळा रचला. सर्वप्रथम लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता आरोपीने तडजोड करीत २ हजार रुपये लाच मागितली. यानंतर त्याने लाचेची रक्कम घेतली असता दबा धरून बसलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यास लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडले. आरोपी चव्हाण हा महावितरणच्या खडकेश्वर शाखा कार्यालयांतर्गत कंत्राटी मीटर रिडर म्हणून कार्यरत होता. त्याच्याविरुद्ध छावणी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
दोन हजारांची लाच घेताना महावितरणचा कंत्राटी कर्मचारी पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:19 IST