लातूर : देवणी पंचायत समितीमध्ये बुधवारी घेण्यात आलेल्या मासिक बैठकीत कार्यालयीन अधीक्षकास पंचायत समित सदस्यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. शिवाय, धमकावलेही. या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा परिषदेत सर्व अधिकारी, कर्मचारी संघटनांनी गुरुवारी लेखणी बंद आंदोलन केले़देवणी पंचायत समितीची बुधवारी मासिक बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत पं.स. सदस्य संदीप पाटील, प्रताप रेड्डी यांनी कार्यालयीन अधीक्षक एच़ जी गिरी यांच्यावर विविध प्रकारचे आरोप केले. या सर्व आरोपाचे खंडण गिरी यांच्याकडून करण्यात आले़ त्यामुळे त्यांनी अधीक्षक गिरी यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. हा सर्व प्रकार सर्व सदस्य तसेच पदाधिकाऱ्यांसमोर घडला़ याची माहिती गुरूवारी जि़प कार्यालयातील कर्मचारी संघटनेस कळताच दुपारी १२ नंतर लेखणी बंदचे आंदोलन पुकारण्यात आले़ सर्व कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद करून कार्यालयातून बाहेर पडून जिल्हा परिषदेच्या उद्यानात सर्वजण एकत्र येवून देवणी येथील घटनेचा निषेध नोंदवण्यात आला़ यावेळी कर्मचारी युनियनचे अध्यक्ष संतोष माने, दिलीप कांबळे, रामराजे आत्राम, जि़प़सदस्य राजेसाहेब सवाई, उप मुख्यकार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी झालेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला़ आंदोलनात जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, कास्ट्राईब संघटना, आदिवासी कर्मचारी संघटना, लेखा कर्मचारी संघटना, लिपीकवर्गीय कर्मचारी संघटना, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनांनी पाठिंबा दर्शवून काम बंद आंदोलनात सहभाग नोंदविला. (प्रतिनिधी)
शिवीगाळ प्रकरणी लेखणी बंद आंदोलन
By admin | Updated: January 16, 2015 01:09 IST