लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील अवैध वाळूसाठे व वाळू वाहतूक करणाºयांवर जिल्हाधिकारी पी.शिवशंकर एकीकडे कडक कारवाई करीत असताना दुसरीकडे गंगाखेड तालुक्यातील महातपुरी व सोनपेठ तालुक्यातील खडका भागातील रस्त्यालगत चक्क अवैध वाळू साठ्यांचे डोंगर उभे केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे महसूलच्या स्थानिक अधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाळू माफियांचे धाडस वाढल्याने चक्क शासकीय जागेतच हे वाळूसाठे करण्यात आले आहेत.परभणी जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या गोदावरी, पूर्णा व दुधना नद्यातील वाळूचा अवैधरित्या बेसूमार उपसा करण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून सर्रासपणे सुरु आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या या वाळूच्या व्यवसायात जिल्ह्यासह परजिल्ह्यातील कंत्राटदारही उतरले आहेत. जिल्ह्यातील ७० पैकी ३५ वाळूघाटांचा लिलाव झाला असून ३५ वाळूघाटांचा लिलाव झालेला नाही. तब्बल पाच वेळा या ३५ वाळूघाटांची निविदा काढण्यात आली. परंतु, प्रतिसाद मिळाला नसल्याने ते लिलावात गेले नाहीत. परिणामी प्रशासनाला अपेक्षित असलेला महसूल मिळालेला नाही. असे असले तरी लिलाव न झालेल्या वाळू घाटांंमधून बेसूमार वाळूचा उपसा माफियांकडून सुरु आहे. याशिवाय लिलाव झालेल्या घाटांमधूनही ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा कित्येक पट्टीने अधिक वाळूचे उत्खनन केले जात आहे. या बाबीवर महसूल विभागाचे नियंत्रण नसल्याने प्रदूषणाच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे. असे असताना महसूल विभागातील संपूर्ण यंत्रणा चुकीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी पुढे येणे अपेक्षित असताना काही मोजकेच अधिकारी या बाबत चांगले काम करीत आहेत. काही काम चुकार अधिकाºयांच्या सहकार्यामुुळे वाळू माफियांचे काम सोपे झाले आहे. त्यातूनच हजारो ब्रास वाळू उचलली जात आहे. यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. अवैधरित्या वाळू वाहतूक व वाळू उपसा करणाºयांवर जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी गेल्या काही दिवसांपासून कारवाई करण्यास सुरुवात केली असली तरी त्यांना त्यांच्याच विभागातील अन्य कर्मचाºयांकडून फारसे सहकार्य मिळत नसल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने गुरुवारी सोनपेठ ते महापुरी दरम्यानच्या रस्त्याची पाहणी सदर प्रतिनिधीने केली असता गंभीर बाब निदर्शनास आली. सोनपेठ तालुक्यातील खडका या गाव परिसरातील रस्त्यालगत वाळूचे ढीगच ढीग केले असल्याचे दिसून आले. याशिवाय याच रस्त्यावरील गंगाखेड तालुक्यातील महातपुरी शिवारात तर वाळूसाठ्यांचा कहरच झाला आहे. रस्त्याच्या उजव्या बाजुला जीथपर्यंत नजर जाईल तीथपर्यंत वाळूचे साठे दिसून येतात. डाव्या बाजुलाही रस्त्यालगतच वाळूसाठे बिनदिक्कतपणे करण्यात आले आहेत. स्थानिक महसूलच्या अधिकारी व कर्मचाºयांची याकडे दुर्लक्ष केल्यामुळे चक्क शासकीय जागेतच हे वाळूसाठे करण्यात आले आहेत. त्यामुळे महसूल यंत्रणेची या साठे धारकांना भितीच नसल्याचे एकप्रकारे दिसून आले.विशेष म्हणजे गंगाखेडहून महातपुरीमार्गे सोनपेठला जाताना किंवा सोनपेठहून गंगाखेडकडे या मार्गावरुन परतण्यासाठी हा एकमेव रस्ता असताना महसूलच्या अधिकारी व कर्मचाºयांना हे वाळूसाठे कसे काय दिसत नाहीत, असा सवाल उपस्थित होत आहे. दोन वर्षापूर्वी ‘लोकमत’च्या वतीने या परिसराचे अशाच प्रकारे स्टिंग आॅपरेशन करण्यात आले होते. त्यावेळही अशीच परिस्थिती पहावयास मिळाली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी एस.पी.सिंग यांनी त्यावेळी कारवाई करुन अनेक अवैध साठे जप्त केले होते. परंतु, अधिकारी बदलले व कारवाईमध्ये सातत्य राहिले नाही.परिणामी वाळू माफिया गब्बर होत गेले आणि चक्क शासकीय जागेवरच त्यांनी अवैध वाळू साठे करण्यास सुरुवात केली. जिल्हाधिकारी पी.शिव शंकर ही बाब कितपत गांभीर्याने घेतात, यावर बरेच अवलंबून असणार आहे.
रस्त्यालगत वाळूसाठ्यांचे डोंगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:50 IST