पाचोड : आजारपणात एकट्याला सोडून का आली, असे म्हणून पतीने माहेरी गेलेल्या पत्नीला बोलावून घेऊन आईच्या समोर दोरीने गळा आवळून तिचा खून केल्याची घटना पैठण तालुक्यातील एकतुनी येथे घडली. गुरुवारी रात्री घडलेल्या या घटनेची शुक्रवारी पाचोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.रेणुका विलास घोडके असे मृत महिलेचे नाव असून विलास सर्जेराव घोडके याच्या विरुद्ध त्याच्या आईच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी सुभद्राबाई या मुले आणि सुनांसोबत राहतात. त्यांचा दुसरा मुलगा विलास याचे सतत दुखत असल्याने तो पत्नी रेणुका व एक लहान मुलगा केतन याला घेऊन उपचारासाठी गेला होता. मात्र त्या ठिकाणी केतनचेच दुखू लागल्याने रेणुका मुलाला घेऊन गावी आली. काही दिवसानंतर विलासही गावी आला. दरम्यान, रेणुका माहेरी गेली होती. विलास आल्यावर त्याने आईला रेणुकाविषयी विचारले. त्यांनी ती माहेरी गेल्याचे सांगितले. त्यावर विलास चिडला. त्याने लागलीच रेणुकाला फोन करून बोलावून घेतले. गुरुवारी रात्री सर्व परिवार जेवण करून झोपी गेल्यावर अचानक विलास व रेणुका यांच्यात भांडण सुरू झाले. रेणुका जोरात ओरडत होती. विलास दोरीने तिचा गळा आवळत होता. सुभद्राबार्इंनी आवाज ऐकल्यावर मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र विलासने त्यांना चावा घेऊन ढकलून दिले. विलास आपल्याला ऐकणार नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी मदतीसाठी गावात धाव घेतली. दरम्यान, गावातून पोलीस पाटील, सरपंच, गावकरी तात्काळ घटनास्थळाकडे आले; परंतु तोपर्यंत विलासने दोरीने गळा आवळून रेणुकाचा खून केला होता. तो घटनास्थळावरून फरारही झाला होता. याप्रकरणी सुभद्राबाई घोडके यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी विलास घोडकेच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि. धबडगे, फौजदार संपत पवार, रमेश खुणे, जमादार महादेव निकाळजे, संजय चव्हाण यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक बसवराज तेली, पोलीस उपअधीक्षक चंद्रकात अलसटवार यांनीही घटनास्थळाला भेट दिली
आईसमोरच पत्नीचा खून
By admin | Updated: March 28, 2015 00:48 IST