कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, दरवर्षी गुरुपौर्णिमा जवळ आली की, बालपणीचे दिवस मला आठवतात. एकामागून एक बालपणीचे ते सर्व प्रसंग आठवायला लागतात. आठवणी या रेल्वेच्या डब्यासारख्या असतात. एकामागे दुसरा डबा जोडावा तसे आठवणीचे प्रसंग जोडले जातात. जिच्या पोटी मी जन्म घेतला ती माझी आई, हीच माझा पहिला गुरू. कारण घरात अठराविश्व दारिद्र्य आणि दोन वेळच्या भाकरीची वानवा. अशा काळात तिच्यामध्ये मला आत्मा आणि ईश्वराचा साक्षात्कार झाला. ती माझी आई... यशोदा तिचे नाव. बाबासाहेबांचा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा संदेश तिने मला शालेय वयातच दिला. वडील आनंदा यांचेही पाठबळ मोलाचे. शाळेत शिकत असतानाच केळुस्कर गुरुजींचेभगवान गौतम बुद्धांचे चरित्र्य वाचायला मिळाले. बुद्धांचा शांतीचा संदेश मनावर कोरला गेला. जगभर सगळीकडे फिरलो. कधी शिक्षणासाठी, कधी संशोधनासाठी. अनेकदा पर्यटनासाठीसुद्धा; परंतु हवाई भराऱ्या घेत असतानाही माझे पाय नेहमी जमिनीवरच राहिले. माती अन् मातीशी असलेले नाते जोडत असताना चाळ शिरंभे (ता. कराड, जि. सातारा) येथील जि. प. शाळेचा विद्यार्थी आणि आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा कुलगुरू या अर्धशतकाच्या वाटचालीत अनेक गुरुजी आणि मित्र भेटले. कराडच्या यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजमध्ये बी. एस्सी केले. तिथेच मला एन.जे. पवार हा मित्र भेटला. जो आज शिवाजी विद्यापीठाचा कुलगुरू आहे. कॉलेजात सोबत असताना दोघेही पुणे विद्यापीठात प्रोफेसर झालो. दुसऱ्याकडूनही अनेक गोष्टी शिकलो. वर्गातला मित्र, विदेशातील संशोधक आणि आता विद्यापीठातले सहकारी या प्रत्येकाकडून काही ना काही शिकलो.
आई हाच माझा गुरू
By admin | Updated: July 12, 2014 01:04 IST