दत्तात्रय कांबळे । लोकमत न्यूज नेटवर्कमुखेड : जांभळी (ता़ मुखेड) येथील सूर्यकांत हिवराळे यांचा २६ जून रोजी अपघाती मृत्यू झाला़ दहा वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे हृदयविकाराने निधन झाले़ हिवराळे पती-पत्नी, तीन मुली, एका मुलाला मागे सोडून गेले़ यातील दोघांचे अजून लग्न व्हायचे आहे़ आईवडीलच नसल्याने आता आम्हाला वाली कोण? असा सवाल मुलगा व मुलीचा आहे़ मयत सूर्यकांत हिवराळे (वय ५०) यांना तीन मुली व एक मुलगा़ पत्नी कृष्णाबाई सूर्यकांत हिवराळे यांचा हृदयविकाराने दहा वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता़ हे दु:ख पचवत असताना सूर्यकांत हिवराळे यांनी दोन मुलींचे थाटामाटात लग्न केले़ एक मुलगी प्रभावती हिवराळे (वय १५) व मुलगा माधव (वय १८) यांच्या पुढील भविष्यासाठी जीवन जगणाऱ्या सूर्यकांत यांच्यावर सोमवारी काळाने घात केला़ होनवडज फाटानजीक त्यांचा अपघाती मृत्यू झाला़ परिवाराचाच आधारवड गेल्याने प्रभावती व माधव यांना दु:खातून बाहेर येणे कठीण आहे़ मृत सूर्यकांत हिवराळे व त्यांचा पुतण्या योगेश नरवाडे (वय २४) हे एम़ एच़ २६ - ए़ क्यू़ ५५५९ या क्रमांकाच्या मोटारसायकलवर आठवडी बाजारासाठी म्हणून जांभळी येथून मुखेडकडे येत होते़ होनवडज फाटा चढवळणावर एम़ एच़ २६ - सी़ २९३६ या क्रमांकाच्या जीपची समोरासमोर टक्कर झाली़ यात सूर्यकांत यांचा जागीच मृत्यू झाला़ तर योगेश गंभीर जखमी झाले़ उपस्थितांनी प्रथम मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी नांदेडला हलविले़ अपघातात मोटारसायकलचा चेंदामेंदा झाला़ जीपचेही नुकसान झाले़ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी आपल्या सहकाऱ्यासह घटनास्थळी भेट देऊन जीप चालक प्रेमराज कांबळे याला ताब्यात घेऊन त्याच्याविरूद्ध गुन्हा नोंदवला़
आई गेली, वडिलांचा अपघाती मृत्यू, आता वाली कोण?
By admin | Updated: June 27, 2017 00:24 IST