औरंगाबाद : जन्मजात आजारामुळे असह्य त्रासाने विव्हळणाऱ्या आपल्या साडेतीनवर्षीय चिमुरडीला साडीने गळफास देऊन मातेने तिची मुक्तता केली आणि नंतर स्वत: गळफास घेऊन या जगाचा निरोप घेतल्याची हृदयद्रावक घटना रविवारी सायंकाळी बेगमपुऱ्यात घडली. स्वत:च्या वाढदिवसालाच विवाहितेने हे टोकाचे पाऊल उचलण्यामागे अन्य काही कारण आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.
अमृता किशोर मुळे (२४, रा. बेगमपुरा) आणि अवंतिका किशोर मुळे (साडेतीन वर्षे), अशी मृत माय-लेकीची नावे आहेत. सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांनी सांगितले की, बोबडेवाडी (ता.केज, जि. बीड) येथील अमृता आणि बेगमपुऱ्यातील किशोर यांचा विवाह २०१४ साली झाला. या दाम्पत्याला २०१५ साली अवंतिका ही मुलगी झाली. अवंतिकाला जन्मापासूनच आजार असल्याने तिच्यावर सतत उपचार करावे लागत होते. अवंतिका या आजारामुळे चिडचिड आणि रडारड करायची. अवंतिकाला होणारा त्रास पाहून अमृता बेचैन होई.
रविवारी दुपारी अमृता आणि अवंतिका यांनी जेवण केले. दुपारी तीन वाजेच्या सुमारास अमृता आणि अवंतिका पहिल्या मजल्यावरील त्यांच्या खोलीत होते. तब्येत ठीक नसल्याने अमृताचा पती किशोर दुसऱ्या मजल्यावरील खोलीत आराम करीत होते. चार वाजेच्या सुमारास किशोर झोपेतून उठले. जेवण करायचे असल्याने त्यांनी अमृताला उठविण्यासाठी खोलीचे दार ठोठावले; मात्र तिने आतून प्रतिसाद न दिल्याने ती झोपली असेल, असे समजून ते स्वयंपाक खोलीत जाऊन बसले. अर्धा ते पाऊण तासानंतर किशोरसह अन्य नातेवाईकांनी खोलीचे दार ठोठावले, मात्र अमृता आणि अवंतिका प्रतिसाद देत नसल्यामुळे सर्वांनी मिळून सव्वापाच वाजेच्या सुमारास दार तोडले. तेव्हा अमृता आणि अवंतिका या माय-लेकी गळफास घेतलेल्या अवस्थेत पंख्याला लटकलेल्या दिसल्या.
या घटनेची माहिती बेगमपुरा पोलिसांना देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक विनोद बदक आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर माय-लेकीचे मृतदेह घाटी रुग्णालयात हलविले.
...तर टळली असती घटनाअमृताचे शिक्षण पदवीपर्यंत झाले होते. तिचा पतीही पदवीधर असून, तो खाजगी वाहनचालक आहे. नोकरी मिळणे अवघड झाल्याने अमृताने काही दिवसांपूर्वीच शिवणक्लास लावला. ती रोज दुपारी एक ते तीन शिवणक्लासला जात असे. रविवारी सुटी असल्याने ती घरीच होती. तिचा जर आज शिवणक्लास असता तर चिमुकलीचा खून करून स्वत:ही आत्महत्या करण्याचा विचार तिच्या डोक्यात आला नसता आणि आजची घटना टळली असती, असे तिचे सासरे सहायक उपनिरीक्षक दिलीप मुळे यांनी सांगितले.