पाटोदा : शवागारात मृतदेह टिकवून ठेवण्यासाठीचे मॉर्च्युरी कॅबिनेट यंत्र येथील ग्रामीण रूग्णालयासमोर वर्षभरापासून धूळ खात पडून आहे. रूग्णालयात मशीन आले मात्र शवागार इमारत नसल्याने त्याला बाहेर ठेवण्यात आले होते. आता शवागार इमारत उभारूनही केवळ शिफ्टींग खर्चामुळे हे मशीन धूळ खात पडून आहे. एकूणच या मॉर्च्युरी कॅबिनेट यंत्राला ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण रुग्णालयामधून काही कारणास्तव मृतदेह टिकवून ठेवण्याची वेळ आली तर ते हवाबंद व वैशिठ्यपूर्ण पद्धतीने ठेवावे लागतात. त्यासाठी मॉर्च्युरी कॅबिनेटचा वापर केला जातो. आरोग्य विभागाने हे यंत्र पुरवठा केला. पाटोदा ग्रामीण रूग्णालयासाठी दोन यंत्र आले होते. यापैकी एक यंत्र हे बीडच्या जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. राहिलेल्या एका यंत्रासाठी शवागार किंवा निवारा नसल्याने ते उघड्यावर ठेवलेले आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर इमारतीच्या बांधकामासाठी पाच लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. सध्या इमारत बांधून तयार झाली आहे. मात्र यंत्र इमारतीमध्ये नेण्यासाठी निधी कोणी खर्चावा यामुळे ही मशीन आजही धूळखात पडून आहे. याबाबत प्रभारी अधीक्षक डॉ. एम.बी. सानप म्हणाले, मॉर्च्युरी कॅबिनेट यंत्र इमारतीमध्ये ठेवण्यासाठी येणाऱ्या खर्चाची तरतूद कोणी करावी यासाठी वरिष्ठांक डे पत्रव्यवहार चालू आहे. आम्ही बांधकाम विभागास यंत्र इमारतीमध्ये ठेवण्याबाबत कळविले होते. (वार्ताहर)
मॉर्च्युरी कॅबिनेट यंत्र धूळ खात !
By admin | Updated: September 27, 2014 23:32 IST