जिंतूर : पालिका कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी तहसीलवर सोमवारी मोर्चा काढला़ मागील पाच दिवसांपासून नगरपालिका कर्मचारी संपावर आहेत़ पालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी १०० टक्के अनुदान व रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करणे या प्रमुख मागणीसाठी पालिका कर्मचारी आंदोलन करीत आहेत़ या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज जिंतूर येथे पालिका कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला़ मोर्चाचे निवेदन तहसीलदार बोरगावकर यांना देण्यात आले़ निवेदनात म्हटले आहे की, राज्य कर्मचारी संघटनेच्या आदेशानुसार हे आंदोलन सुरू असून, राज्य पातळीवर शासनाने या आंदोलनाची तत्काळ दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली़ मागील पाच दिवसांपासून पालिका कर्मचारी संपावर गेल्यामुळे शहरामध्ये स्वच्छता व पाणी पुरवठ्यावर फारसा फरक पडला नसला तरी या कर्मचाऱ्यांच्या मागण्या तत्काळ मान्य कराव्यात, अशी सर्वसामान्यांतून मागणी होत आहे़ निवेदनावर आऱ बी़ चव्हाण, पी़ बी़ मोरे, एस़ आऱ होनराव, के़ बी़ तळेकर, बी़ एस़ डोईफोडे, पी़ बी़ सिरसाठ, अजीज जानीमियाँ, पी़ एऩ साबळे, ए़ जी़ साबळे, कच्छवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत़
पालिका कर्मचाऱ्यांचा तहसीलवर मोर्चा
By admin | Updated: July 22, 2014 00:17 IST