बीड : जिल्ह्यात दोन दिवसापासून रिमझिम पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. शेतजमिनीतील ओल कायम राहत असून तूर, उडिद, मूग, सोयाबीनच्या वाढीकरिता मूर पावसाचा फायदा होत आहे. आठवड्याची सुरवात दमदार व शेवट रिमझिमने होत आहे. पहिल्या टप्प्यात पेरणी झालेल्या पिकांची मशागतीची कामे पूर्ण झाल्याने पिके बहरात आहेत. तर तण वाढलेल्या भागात सध्या मशागतीच्या कामात शेतकरी गुंतला आहे. शनिवारी जिल्ह्यात २३ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. यापुर्वी झालेल्या पावसात मंडळानिहाय तफावत होती. रिमझिम का होईना सर्वदूर पाऊस होत असून ढगाळ वातावरण कायम आहे. पिकांबरोबर तण वाढत असल्याने खुरपनी, कोळपनीसारखी मशागतीची कामे सुरू झाली आहेत. ऐन गरजेच्या वेळी पाऊस लागून राहत असल्याने शेतकऱ्यांना खरिपाबाबत शाश्वती वाटू लागली आहे. सरासरी क्षेत्रापेक्षा अधिक पेरणी यंदा झाली आहे. त्यामुळे तुर, उडिद, मूगाचे क्षेत्र वाढले असून या पिकांनाच सध्याचा पाऊस फलदायी ठरत असल्याचे कृषी अधिकारी रामेश्वर चांडक यांनी सांगितले.रिमझिम सुरूच ढगाळ वातावरणासह जिल्ह्यात तीन दिवसापासून रिमझिम सुरू आहे. कमी-अधिक प्रमाणात सुरू असलेल्या पावसाने पाणी पातळीत वाढ होत आहे. शेतजमिनीतील ओल कायम टिकून राहत आहे. शनिवारी गेवराई (१२.९ मिमी) , वडवणी (१५.५), माजलगाव (२८.७), परळी (१२.४) ची नोंद झाली आहे. रविवारीही दिवस उजाडल्यापासून पावसाची रिमझिम कायम होती. (वार्ताहर)
मूर पावसाचा खरीप पिकांना फायदा
By admin | Updated: July 11, 2016 00:30 IST