औरंगाबाद : रविवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर सोमवारी रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे. औरंगाबादेत हिलाल कमिटीने चंद्रदर्शनाची घोषणा केल्यावर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. रात्री उशिरापर्यंत बाजारात खरेदीसाठी नागरिकांनी एकच अलोट गर्दी केली होती. शहागंज, सिटीचौक, पैठणगेट आदी भागांत नागरिकांचा जनसागर उसळला होता.यंदा पवित्र रमजान महिन्यात २९ रोजे झाले. मुस्लिम बांधवांनी आणि व्यापाऱ्यांनी सोमवारीच ईद होईल, यादृष्टीने तयारी सुरू केली होती. रविवारी सायंकाळी मुस्लिम बांधवांनी २९ वा उपवास सोडल्यानंतर चंद्रदर्शन होईल का याचा अंदाज घेतला. त्यानंतर कमिटीने लगेचच सोमवारी ईद साजरी होणार असल्याची घोषणा केली. ईद सोमवारीच साजरी होणार हे जाहीर झाल्याने खरेदीसाठी बाजारात अलोट गर्दी झाली होती. रविवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाल्याने प्रमुख ईदगाहमध्ये चिखल निर्माण झाला आहे. भाविकांना ईदची मुख्य नमाज अदा करताना त्रास होऊ नये याची काळजी घेण्यात येत आहे.
चंद्रदर्शन झाले; आज ईद-उल-फित्र
By admin | Updated: June 26, 2017 00:51 IST