औरंगाबाद : रेल्वेस्थानकावरील पार्सल विभागात महिनोन्महिने अनेक पार्सल पडून राहत असल्याची परिस्थिती दिसून येत आहे. त्यामुळे अशा पार्सलमधील वस्तूंचा थेट लिलाव करून विल्हेवाट लावली जात आहे. औरंगाबाद रेल्वेस्थानकावरील पार्सल विभागात दर महिन्याला पार्सलच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होते. औरंगाबादहून विविध ठिकाणी जाणाऱ्या पार्सलची संख्या मोठी आहे. याशिवाय अन्य ठिकाणांहून येणाऱ्या पार्सलची संख्याही बरीच आहे. पार्सलची ही संख्या प्रत्येक महिन्यात कमी-अधिक प्रमाणात बदलत असते. अपुरी कर्मचारी संख्या आणि पार्सलची संख्या पाहता रेल्वेच्या पार्सल विभागावर मोठा भार पडत असल्याचे अनेकदा दिसून येते. येथून विविध पार्सलसह मोठ्या कंपन्यांचा मालही बाहेर पाठविला जात असल्याने त्यातून उत्पन्न वाढीस मोठा हातभार लागतो; परंतु मोठ्या मालामुळे अनेकदा अन्य छोट्या पार्सलकडे काहीसे दुर्लक्ष होते. यातून पार्सलधारकास ‘पार्सल आलेच नाही, पार्सलची नोंद नाही, नंतर या’ अशी उत्तरे अनेकदा ऐकावी लागतात. त्यामुळे पार्सल नेण्यासाठी अनेकांना वारंवार खेटे मारावे लागतात.रेल्वेच्या नियमाप्रमाणे आलेले पार्सल वेळेवर नेले नाही, तर तासाप्रमाणे दंड आकारला जातो. अनेकदा विविध कारणांनी पार्सल नेण्यास उशीर होतो. त्यामुळे ज्या दिवशी पार्सल नेण्यास संबंधित व्यक्ती येते, त्यावेळी तिच्यावर दंडाची रक्कम भरण्याची वेळ येते. अशा वेळी अनेकदा दंडाची रक्कम ही पार्सलमधील वस्तूच्या किमतीपेक्षा अधिक होते. त्यामुळे पार्सल घेऊन जाणारी व्यक्ती तेथून काढता पाय घेते. यामुळेही पार्सल कार्यालयातच पडून राहतात.विभागात आलेले पार्सल घेऊन जाण्याची तीन महिने प्रतीक्षा केली जाते. यानंतर संबंधितांना पार्सल घेऊन जाण्याबाबत नोटीस दिली जाते. ४तरीही न गेल्यास वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेऊन नियमाप्रमाणे पार्सलच्या वस्तूंचा लिलाव केला जात असल्याचे पार्सल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
महिनोनमहिने पार्सल कार्यालयातच पडून
By admin | Updated: November 27, 2014 01:09 IST