परभणी : जिल्ह्यात पावसाने सरासरीची शंभरी गाठली आहे़ परंतु, यासाठी तब्बल दोन महिन्यांचा कालावधी लागला़ त्यामुळे या पावसाचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काडीमात्र लाभ झालेला नाही़ सध्या दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे़परभणी जिल्ह्यात कृषीवर अर्थव्यवस्था अवलंबून आहे़ कृषीक्षेत्र अधिक असल्याने बहुतांश नागरिकांचा कृषी हाच प्रमुख व्यवसाय आहे़ शेती व्यवसाय पावसाशी निगडित असून, निसर्गाच्या लहरीपणामुळे हा व्यवसाय अडचणीत सापडला आहे़ यावर्षी तर परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे़ अवकाळी पाऊस आणि गारपिटीने रबी हंगाम हातचा गेला होता़ त्यामुळे शेतकऱ्यांची भिस्त खरिपावरच होती़ परंतु, ऐनवेळी पावसाने पाठ फिरवली आणि खरीप हंगामही धोक्यात सापडला आहे़ जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ७५० मिमी एवढी आहे़ २८ जुलैपर्यंत जिल्ह्यात १०७़५३ मिमी सरासरी पाऊस झाला आहे़ गतवर्षीची तुलना करता आजच्या तारखेपर्यंत गतवर्षी ३०० मिमी पाऊस झाला होता़ वेळेवर पाऊस झाला तर पेरण्याही वेळेवर होतात़ परंतु, यावर्षी पावसाची वाट पाहत शेतकऱ्यांनी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पेरण्यांना प्रारंभ केला़ पाऊस नसतानाही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या़ परंतु, पेरलेले उवगले नाही़ त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत सापडले आहेत़ सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ६़९८ मिमी पाऊस झाला होता़ सोनपेठ तालुक्यात सर्वाधिक १४ मिमी तर गंगाखेड तालुक्यात सर्वात कमी ४ मिमी पाऊस झाला़ पालम ६, पूर्णा ५़२०, सेलू ८, पाथरी ९, जिंतूर ५़३३ आणि मानवत तालुक्यामध्ये ४़६७ मिमी पाऊस झाला आहे़ आतापर्यंत झालेल्या पावसामध्ये सोनपेठ तालुका आघाडीवर असून या तालुक्यात १३१ मिमी पाऊस झाला आहे़ तर पालम तालुक्यात सर्वात कमी ८९ मिमी पाऊस झाला़ परभणी तालुक्यात ११०़३५ मिमी, पूर्णा ९१़४४, गंगाखेड १००़२५, सेलू १२१़८, पाथरी ११३, जिंतूर १०७़१६, मानवत १०३़९६ मिमी पाऊस झाला आहे़ (प्रतिनिधी)
जिल्ह्यात पावसाने गाठली शंभरी
By admin | Updated: July 29, 2014 01:07 IST