औरंगाबाद : ‘मोदी सरकार आयी है.... महंगाई लायी है, मोदी सरकार हायऽऽ हाय.... रेल्वे दरवाढ रद्द झालीच पाहिजे, मोदी सरकारचा धिक्कार असो’अशा घोषणा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी औरंगाबाद रेल्वेस्थानक दणाणून सोडले. मोदी सरकारने अलीकडेच केलेल्या रेल्वे दरवाढीचा निषेध करण्यासाठी कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे झेंडे फडकावत एक तास रेल्वेस्थानकावर रेल्वे रोको आंदोलन केले. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष केशवराव औताडे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम व प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अरुण मुगदिया यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. ‘अच्छे दिन’चे खोटे स्वप्न दाखवून सत्ता हस्तगत करून आता जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्या मोदी यांचा यावेळी कार्यकर्त्यांनी खरपूस समाचार घेतला. दुपारी १२.४० वा. नगरसोल- नरसापूर ही रेल्वेगाडी स्थानकावर आली असता ती सुमारे एक तास अडविण्यात आली. यावेळी घोषणांचा जोरदार पाऊस सुरू झाला. रेल्वे दरवाढीचा निषेध करणारी व दरवाढ त्वरित मागे घेण्याची मागणी करणारी निवेदने काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री सदानंद गौडा व यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नावे पाठविण्यात आली. मनपा विरोधी पक्षानेता रावसाहेब गायकवाड, नगरसेवक बाळूलाल गुर्जर, शहर काँग्रेसचे सरचिटणीस राजकुमार जाधव, नितीन पाटील, जगन्नाथ काळे, अविनाश कुलकर्णी, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस किरण पाटील डोणगावकर, उपाध्यक्ष सुभाष ठोकळ, जि. प. गटनेते विनोद तांबे, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शोभा खोसरे, बबन डिडोरे पाटील, योगेश मसलगे पाटील, अनिल मुळे, जमील अहमद खान, इकबालसिंग गिल, महेंद्र रमंडवाल, सरोज मसलगे पाटील आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.
‘मोदी सरकार आयी है... महंगाई लायी है’
By admin | Updated: June 26, 2014 01:00 IST