जालना : मॉडेल रेल्वेस्थानक म्हणून दर्जा मिळालेल्या जालना स्थानकाला रविवारी झालेल्या दमदार पावसामुळे गळती लागल्याचे दिसून आले. स्थानकात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. कँटिनमध्ये पाय ठेवण्यासाठी जागा नसल्याने प्रवाशांना उभे राहून खाद्य पदार्थ खावे लागले. जालना स्थानकात रेल्वेकडून विविध मूलभूत सुविधांचे काम करण्यात येते. एरवी चकाचक दिसणारे स्थानक मोठा पाऊस पडताच अस्वच्छ झाले. स्थानकातील तीन फलाटांवर पाईपमधून तसेच पत्रांतून गळती लागल्याने गळती प्रवाशांची गैरसोय झाली. कँटिनमध्येही गळती सुरू होती. कँटिनच्या बाहेर मोठी गळती लागली होती. स्थानकात प्रवेश करताच उजव्या बाजूला छतावरील पाणी थेट साचत होते. यामुळे प्रवाशांना चालताना मोठी कसरत करावी लागली. फलाट क्रमांक दोनवरही ठिकठिकाणी गळती लागली होती.फलाट क्रमांक एकवर पाणी साचू नये म्हणून स्थानकातील कर्मचाऱ्यांनी डस्टबिन ठेवून पाणी अडविण्याचा प्रयत्न केला. असे असले तरी प्रवाशांची गैरसोय दूर करण्यात प्रशासन कमी पडले. एकूणच मॉडेल म्हणून स्थानक गळत असल्याने प्रवशांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. (प्रतिनिधी)विजेवर चालणाऱ्या सरकत्या जिन्याचे काम प्रगतीपथावर आहे. वयोवृद्धांसाठी हा जीना फायदेशीर ठरणार आहे. येत्या काही दिवसांत हा जीना कार्यान्वित होणार आहे.
मॉडेल स्थानकला लागली गळती...!
By admin | Updated: July 11, 2016 00:12 IST