औरंगाबाद : गुंठेवारी भागात आमदार निधी आणि विशेष निधीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. एकेकाळी समस्यांचे आगर असलेल्या या गुंठेवारी भागाचा आज पूर्णत: कायापालट झाला आहे. प्राथमिक सुविधांची पूर्तता केल्यामुळे येथील नागरिकांचे जीवनमान उंचावले असल्याचा विश्वास राजेंद्र दर्डा यांनी प्रचार रॅलीदरम्यान व्यक्त केला. काँग्रेसचे औरंगाबाद पूर्वचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांच्या प्रचारार्थ विद्यानगर, विजयनगर, बाळकृष्णनगर, शिवनेरी कॉलनी, भारतनगर आनंदनगर या भागांत प्रचार रॅली काढण्यात आली. रॅलीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळला. विद्यानगर चौक येथून प्रचार रॅलीला सुरुवात झाली. राजेंद्र दर्डा यांचे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी व ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. समारोपप्रसंगी घेण्यात आलेल्या कॉर्नर सभेत राजेंद्र दर्डा यांनी नागरिकांशी संवाद साधला. शहरात झालेल्या विकासकामांचे सर्वांत मोठे उदाहरण म्हणून गुंठेवारी भागाकडे पाहिले जाते. ड्रेनेजलाईन, सिमेंट रस्ते, विंधन विहिरी, सामाजिक सभागृहे, खुले रंगमंच, खेळांची मैदाने व रुग्णालये, अशी अनेक विकासकामे या भागात केली. आमदार निधी, खासदार विजय दर्डा यांचा खासदार निधी आणि विशेष निधीचा वापर करून या भागाचा कायापालट करण्यात यश आल्याचे राजेंद्र दर्डा यांनी स्पष्ट केले. येणाऱ्या काळातही गुंठेवारी भागाच्या विकसासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आमदार निधीच्या माध्यमातून केला
By admin | Updated: October 13, 2014 00:34 IST