नळदुर्ग : लोकमंगल मल्टीस्टेट को-आॅप. सोसायटीच्या तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील शाखेत ३५ लाख ७३ हजार ७३७ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी संबंधित शाखाधिकाऱ्यांविरूध्द नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून ही कार्यवाही करण्यात आली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लोकमंगल मल्टीस्टेट को-आॅप. सोसायटीच्या जळकोट शाखेत १४ सप्टेंबर २०११ ते २१ फेब्रुवारी २०१४ या कालावधीत रविराज हणमंत शिंदे (रा. मुरूम, ता. उमरगा) हे शाखाधिकारी म्हणून कार्यरत होते. या दरम्यान त्यांनी ठेवीदार, खातेदारांनी सोसायटीमध्ये ठेवलेल्या ठेवी संस्थेच्या वह्या, पुस्तके व संगणकात खोट्या नोंदी करून खरे रेकॉर्ड म्हणून भासविले. या माध्यमातून त्यांनी ३५ लाख ७३ हजार ७३७ रुपयांचा अपहार करून संस्थेची फसवणूक केली, अशी फिर्याद तुळजापूर विभागीय अधिकारी राजेश नागनाथ मस्के (रा. सोलापूर) यांनी न्यायालयात दाखल केली होती. याप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून रविराज शिंदे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोहेकॉ बांगर करीत आहेत. (वार्ताहर)
पस्तीस लाखांचा अपहार
By admin | Updated: July 14, 2016 01:01 IST