वाळूज महानगर : साजापुरातून एक १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दिली आहे. साजापुरातील एक १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ३० एप्रिलला मी टेलकरडे जाऊन येते, असे म्हणून घराबाहेर पडली होती. रात्री उशिरापर्यंत ही मुलगी घरी न परतल्याने तिचा नातेवाइकांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र ती कुठेही मिळून न आल्याने तिच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.
वाळूजला मारहाण प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा
वाळूज महानगर : भावाला मारहाण होत असल्याने मध्यस्थीसाठी गेलेल्या लहान भावास मारहाण करणाऱ्या तिघाविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भगवान बन्सोडे (रा.अजवानगर) यास शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास शेजारील नागरिक मारहाण करीत होते. यावेळी भगवान याचा भाऊ सुनील बन्सोडे हा मध्यस्थीसाठी गेला असत अनिल बन्सोडे, कुणाल बन्सोडे व एका महिलेने त्यास बेदम मारहाण केली. या प्रकरणी तिघाविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-----------------
बजाजनगरात ऑनलाइन पारायण सप्ताह
वाळूज महानगर : बजाजनगरात श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज सोमवारी ऑनलाइन पारायण सप्ताहास सुरुवात करण्यात आली. श्री स्वामी सेवा आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरीप्रणीत अ.भा. श्री स्वामी समर्थ सेवापीठ त्र्यंबकेश्वर यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात दररोज सकाळी व सायंकाळी गुरुचरित्र पठण व नित्यधान कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे. शुक्रवारी (दि. ९) या सप्ताहाची सांगता केली जाणार आहे.