औरंगाबाद : महापालिका निवडणुकीसाठी अवघे १६ दिवस बाकी असताना मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाच्या ४४ उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर होताच शहरात इच्छुक उमेदवारांनी ‘एमआयएम’च्या नेत्यांचे अक्षरश: पानिपत केले. तलवारीने हल्ले, दगडफेक, मारामाऱ्या, स्थानिक नेत्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यात आली. एमआयएमची वाताहत उघड्या डोळ्यांनी पाहणारे समर्थक चक्क वर्तमानपत्रांच्या छायाचित्रकारांच्या अंगावर धावून येऊ लागले. रात्री उशिरापर्यंत ‘एमआयएम’मध्ये जोरदार राडा सुरूच होता.‘एमआयएम’ ने शहरात ६० पेक्षा अधिक जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. काही वॉर्डांमध्ये इच्छुकांची संख्या जास्त होती. त्यामुळे तिकिटासाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती. मध्यरात्री एमआयएमने दोन स्थानिक उर्दू वर्तमानपत्रांना ४४ उमेदवारांची यादी दिली. यादीमध्ये आपले नाव नसल्याचे लोटाकारंजा वॉर्डातील काही कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मध्यरात्री ३ वाजता भडकलगेट चौकातील एका हॉटेलकडे मोर्चा वळविला. या हॉटेलमध्ये हैदराबादहून आलेले एमआयएमचे नेते थांबले होते. हॉटेलच्या रूममध्ये शिरून कार्यकर्त्यांनी नेत्यांना बेदम चोप दिला. एकाने तर तलवारच उगारली. हाणामारीत एका कार्यकर्त्याच्या हातावर तलवारीचा वार बसला. परिस्थिती चिघळत असल्याने हॉटेल मालक सलीम मैदेवाला आणि त्यांच्या मुलाने कार्यकर्त्यांना बाहेर काढले. सकाळी हॉटेल मालकाने एमआयएमच्या नेत्यांना हॉटेल सोडण्याचे फर्मान सोडले.सकाळी नऊ वाजेपासून विविध वॉर्डांमध्ये असंतोषाचे नगारे वाजू लागले. आ. इम्तियाज जलील यांच्या निवासस्थानासमोर, त्यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली. ४याच वेळी भडकलगेटजवळ एमआयएमचे नेते डॉ. गफ्फार कादरी कार्यकर्त्यांना दिसले. त्यांना पाहून इच्छुकांनी गराडा घातला. मोठ्या मुश्किलीने त्यांनी आपल्या वाहनात बसून पळ काढला.भडकलगेट परिसरातच एमआयएमच्या कोअर कमिटीचे सदस्य महेफूज-उर-रहेमान राहतात. स्थानिक सर्व नेत्यांनी त्यांच्या घरात आश्रय घेतला. एमआयएमचे कार्यकर्ते तेथेही पोहोचले. कार्यकर्त्यांनी महेफूज -उर-रहेमान यांच्या घरावर दगडफेक सुरू केली. नवाबपुरा येथील काही कार्यकर्ते घरात बळजबरी शिरले. त्यांनी बंद खोलीत उमेदवार व कार्यकर्त्यांना बेदम चोप दिला. राडा बराच वाढल्याने नेत्यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलीस बंदोबस्त असतानाही इच्छुक उमेदवार येऊन नेत्यांना शिवीगाळ करून निघत होते. १‘कागज का ये लिबास, चिरागों के शहर में...जहाँ संभलकर चलो....’ हा बशीर बद्र यांचा प्रसिद्ध शेर ‘एमआयएम’पक्षाला लागू पडतो. या निवडणुकीमध्ये खा. असदोद्दीन ओवेसी आणि अकबरोद्दीन ओवेसी यांना आमखास मैदानावर जाहीर सभा घेता येणार नाही. घेतलीच तर अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागेल, असे मत एमआयएमचे समर्थक आणि एमआयएमचेच इच्छुक उमेदवार जमीर अहेमद कादरी यांनी नमूद केले.२माजी नगरसेवक सलीम मैदेवाला यांनी सांगितले की, मी एमआयएमला उमेदवारी द्याच असे म्हटले नव्हते; पण पक्षाच्या नेत्यांनी आरेफ कॉलनीतून निवडणूक लढवावी असे सांगितले होते. काल रात्रीपर्यंत मला उमेदवारी निश्चित असल्याचे सांगण्यात येत होते. अगोदरच खिचडी शिजली होती, तर आपल्याला उमेदवारी देतो असे सांगायलाच नको होते.
‘एमआयएम’मध्ये घमासान
By admin | Updated: April 7, 2015 01:30 IST