औरंगाबाद : मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षातील दोन नगरसेवकांनी १० मे रोजी स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा सादर केला होता. महापौर त्र्यंबक तुपे यांनी हे राजीनामे विधि विभागाकडे वर्ग केले होते. विधि विभागाने दिलेल्या अभिप्रायानुसार महापौरांनी दोन्ही राजीनामे फेटाळून लावले. स्थायी समितीत एमआयएमचे चार नगरसेवक आहेत. ड्रॉ पद्धतीत पक्षाचे दोन नगरसेवक पहिल्या वर्षी स्थायीमधून बाहेर आले. दरवर्षी चार नवीन नगरसेवक स्थायीत पाठवून प्रत्येकाला संधी देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला. १० मे रोजी स्थायी समितीच्या सदस्य निवडीसाठी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. या निवडणूक प्रक्रियेत एमआयएमचे गटनेते नासेर सिद्दीकी यांनी पक्षाच्या दोन नगरसेवकांची नावे महापौर त्र्यंबक तुपे यांना दिली. त्यानंतर म्हणजेच निवडणूक प्रक्रिया संपल्यावर स्थायीमधील दोन नगरसेवकांचे राजीनामे सोपविले. प्रक्रिया संपल्याने महापौरांनी राजीनामे विधि विभागाकडे वर्ग केले होते. विधि सल्लागार अपर्णा थेटे यांनी महापौरांना आपला अभिप्राय दिला. त्यामध्ये नमूद केले की, महापालिका अधिनियम २३ मध्ये स्थायी समितीत नैमित्तिक जागा भरण्याची तरतूद आहे. राजीनामा कोणाला द्यावा याचा उल्लेख नाही. कलम २० मध्ये स्थायी सदस्यांची नेमणूक करण्याचे अधिकार महापालिकेला आहेत. पीठासीन अधिकारी म्हणून महापौर काम पाहत असतात. त्यामुळे राजीनामे महापौरांच्या नावानेच आले पाहिजेत. एमआयएमचे राजीनामे त्यांच्या गटनेत्यांच्या नावाने आहेत. त्यामुळे हे दोन्ही राजीनामे दखल घेण्यायोग्य नाहीत. विधि विभागाच्या या अभिप्रायामुळे स्थायी समितीमध्ये विकास एडके आणि शेख समिना कायम राहणार हे निश्चित. एमआयएम पक्षाने या दोन्ही सदस्यांऐवजी इतर दोन सदस्य स्थायीत पाठविण्याची घोषणा केली होती.
‘एमआयएम’ नगरसेवकांचे राजीनामे फेटाळले
By admin | Updated: May 15, 2016 00:03 IST