औरंगाबाद : मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीनच्या (एमआयएम) नगरसेवकांना पैसे देऊन पक्ष सोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस भाग पाडत असल्याचा खळबळजनक आरोप गुरुवारी आ. इम्तियाज जलील यांनी केला होता. त्यांच्या आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेसनेही अवघ्या २४ तासांत उत्तरात म्हटले आहे की, होय ‘एमआयएम’चे नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. सध्या ‘सलाम’, ‘आदाब’आणि ‘दुआ’सुरू आहे. आम्ही किंमत कोणाचीच लावलेली नाही, लावणारही नाही. इच्छुक नगरसेवक स्वगृही परतणार असतील तर त्यांचे आम्ही स्वागतच करणार आहोत, असे शहर कार्याध्यक्ष खाजा शरफोद्दीन यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले.‘एमआयएम’पक्षातील अंतर्गत खदखद मागील काही महिन्यांपासून उघडपणे चव्हाट्यावर येत आहे. गुरुवारी आ. इम्तियाज जलील यांनी एका पत्रकार परिषदेत खुलासा केला की, महापालिकेत आम्ही इतर कोणत्याही पक्षासोबत नाही. कधी सेना तर कधी भाजपसोबत विनाकारण आमचे नाव जोडण्यात येत आहे. ‘एमआयएम’च्या काही नगरसेवकांना खरेदी करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून होत आहे. ३० लाख रुपये एका नगरसेवकाची किंमत लावण्यात येत असल्याचेही जलील यांनी नमूद केले होते.शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष खाजा शरफोद्दीन यांनी महापालिकेत एक पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी प्रांजळपणे ‘कबूल’केले की, डिसेंबर २०१५ मध्ये तत्कालीन मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांच्याविरोधात सभागृहात मतदान घेण्याची वेळ आली तेव्हा ‘एमआयएम’ने उघडपणे सांगितले की, आम्ही युतीला पाठिंबा देणार नाही. एका रात्रीतून एमआयएमने यू-टर्न घेत युतीला पाठिंबा दिला होता. आताही स्थायी समितीमध्ये सेनेचा सभापती बिनविरोध निवडून यावा या हेतूने एमआयएमने डाव रचला असल्याचे त्यांनी नमूद केले.शहरात एमआयएम पक्षाचे २५ नगरसेवक निवडून आले आहेत. निवडून आलेले आमचे भाऊबंद आहेत. यातील अनेक जण पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, नेते होते. आज पक्षात त्यांची घुसमट होत असेल तर ते स्वतंत्र गट बनवून स्वगृही परत येण्यास इच्छुक असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करणार, असेही खाजा शरफोद्दीन यांनी सांगितले.
‘एमआयएम’ला खिंडार अटळ
By admin | Updated: May 14, 2016 00:11 IST