लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘औद्योगिक शहर’ अशी बिरुदावली मिरवणा-या औरंगाबादच्या चिकलठाणा एमआयडीसीमध्ये तासन्तास वीज गुल होत असल्यामुळे उद्योजक हैराण झाले असून, दिवसाला १२ कोटी रुपयांपर्यंत आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. नियमित वीजबिले भरूनही नियमित वीज मिळत नसल्यामुळे उद्योजक संताप व्यक्त करीत आहेत.ऐन दिवाळी सणाच्या काळात चिकलठाणा एमआयडीसीतील सुमारे ४५० लघु व मध्यम उद्योगांची वीज खंडित होत असल्यामुळे उत्पादन प्रक्रिया वारंवार बंद करावी लागते. फिडर-२ वरून होणारा पुरवठा कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात येतो. त्यामुळे तास-दीडतास उत्पादन थांबवावे लागते. त्यामुळे उद्योजकांचे प्रतिदिन दहा ते बारा कोटी रुपयांपर्यंत नुकसान होते, असे ‘मसिआ’चे प्रसिद्धीप्रमुख मनीष अग्रवाल यांनी सांगितले.पायाभूत सुविधांचा अभाव असलेल्या या एमआयडीसीमध्ये महावितरणच्या बेभरवशी कारभारामुळे उद्योजकांच्या अडचणींमध्ये भर घातली आहे. गुरुवारी सिडको सर्व्हिस इंडस्ट्रीयल भागात पावणेदोन तास तर सायंकाळी एमआयडीसीत वीज गुल होती. ‘तीन दशकांहून अधिक जुनी यंत्रणा बदलण्यात न आल्याने अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आम्ही प्रामाणिकपणे बिले भरूनही वीज मिळत नसेल तर कोणाकडे दाद मागायची, असा सवाल उद्योजक विचारत आहेत.
खंडित वीजपुरवठ्यामुळे कोट्यवधींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 01:00 IST