औरंगाबाद : केंद्रीय कृषी सचिव प्रवेश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली दोन पथकांनी सोमवारी जिल्ह्यातील तीन गावांना भेटी देऊन दुष्काळाची धावती पाहणी केली. या पथकांनी तिन्ही ठिकाणी तासाभरापेक्षा कमी वेळ घालविला असला तरी त्यांच्या दौऱ्यावर १० लाखांहून अधिक खर्च झाला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. अधिकारी-कर्मचाऱ्यांचा फौजफाटा, गाड्या आणि इतर सुविधांवर हा खर्च करण्यात आला. मात्र, वेगवेगळ्या खात्यांमार्फत हा खर्च करण्यात आल्याने त्यासाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आलेली नव्हती. मराठवाड्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक रविवारी औरंगाबादेत दाखल झाले. यात दहा अधिकाऱ्यांचा समावेश होता. येथे आल्यानंतर त्यांची दोन पथकांत विभागणी झाली. दोन्ही पथकांनी सोमवारी सकाळीच पाहणी दौऱ्याला सुरुवात केली.एकेका पथकात २०-२० गाड्या होत्या. शिवाय त्यांच्यासोबत मंत्रालयातून आलेले आणि पुण्याहून आलेले सुमारे पंधरा वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक पातळीवरील सुमारे पन्नास अधिकारी, शंभर कर्मचारी होते. एका पथकाने सटाणा गावाला दहा मिनिटांची भेट देऊन जिल्हा सोडला, तर दुसऱ्या पथकाने पैठण तालुक्यातील लिंबगाव आणि मुरमा गावांमध्ये अर्धा-पाऊण तास वेळ घालवून बीड जिल्ह्यात प्रवेश केला. पथकाचा जिल्ह्यातील पाहणी दौरा तासाभरापेक्षा कमी काळाचा होता; पण या छोटेखानी दौऱ्यावर १० लाखांहून जास्त खर्च झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पथकांच्या ताफ्यातील गाड्या, त्यांचे डिझेल, पथकातील अधिकारी आणि मुंबई, पुण्याहून आलेल्या अधिकाऱ्यांची बडदास्त, त्यांच्या राहण्या, जेवणाचा खर्च तसेच दोन-तीन दिवस आधीपासून दौऱ्याची तयारी करण्यात व्यस्त असणारे अधिकारी, कर्मचारी आदींवर हा खर्च झाला. पथकासाठी प्रशासनाने काही व्हीआयपी गाड्या भाड्यानेही घेतल्या होत्या. मात्र, हा खर्च विविध विभागांमार्फत करण्यात आला.
पाहणीसाठी लाखोंचा खर्च
By admin | Updated: December 17, 2014 00:39 IST