जालना : रात्री ११ ची वेळमर्यादा देऊनही काही बिअरबार सर्रासपणे मध्यरात्रीपर्यंत सुरू राहत असल्याने आता खुद्द पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनीच कारवाई मोहीम हाती घेतली आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतर १.३० वाजता सिंह यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दोन हॉटेलांवर छापे मारून चालकांसह १६ जणांना ताब्यात घेतले. येथील व्यावसायिकांना रात्री ११ वाजेनंतर व्यवहार बंद करण्याची लेखी सूचना दिल्यानंतरही मध्यरात्रीपर्यंत बिअरबार आणि उपहारगृह चालविणार्यांना पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांनी जोरदार चपराक दिली. येथील उपहारगृह व बिअरबार चालकांना यापूर्वीच पोलिस अधीक्षकांनी नोटीस बजावून आपले व्यवसाय रात्री ११ वाजता बंद करण्याचे सूचविले होते. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नांचा हा भाग आहे. मात्र काही व्यावसायिक प्रतिसाद देत नसल्याचा अहवाल सिंह यांना पाठविण्यात आला होता. हॉटेल व्यवसायाशी निगडीत राजकीय व अन्य काही क्षेत्रातील व्यक्ती प्रतिसाद देत नसल्याने सिंह यांनी स्वत: आखलेल्या विशेष मोहिमेत प्रणय बिअरबार भोकरदन नाका व हॉटेल इंद्रायणी, बसस्थानक जालना या दोन ठिकाणी विशेष पथकासह छापा मारून चालकांसह १६ ग्राहकांनाही ताब्यात घेतले. भोकरदन नाका येथील प्रणय बिअरबार येथे रात्री १२.३० वाजता छापा मारला. यात मालक सतीश जैस्वाल याच्यासह ग्राहक अतुल पाल, शामवेल लोखंडे, अस्लमखान अर्शदखान, अक्षय खर्डेकर, गोपाल शर्मा, विनोद राजपूत, कुणाल विखे, संजूसिंग राजपूत, शिवाजी कदम, सुरजा राजपूत, संजय खंडागळे, शेख अमीन शेख मोहंमद यांना पकडण्यात आले. दुसर्या छाप्यात हॉटेल इंद्रायणी येथे चालक संतोष प्रकाश पवार व विजय कैलास पवार यांना पकडण्यात आले. या दोन्ही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत ग्राहकांना सेवा दिली जात होती. पोलिसांनी छापा मारला त्यावेळी दोन्ही ठिकाणी ग्राहक मद्यधुंद स्थितीत धिंगाणा घालून शांतता भंग करीत होते. पोलिसांनी छापा मारल्यानंतर सर्वांची भंबेरी उडाली. (प्रतिनिधी) बसस्थानक मार्गावरील कारवाई सदर प्रकरणाची नोंद सदर बाजार पोलिस ठाण्यात घेण्यात आली. विशेष बाब म्हणजे सदर बाजार ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील यांनीही दोनच दिवसांपूर्वी सर्वच व्यावसायिकांना सूचना दिली होती. या मोहिमेत उपनिरीक्षक गोकुलसिंह बुंदेले, शिवाजी जमदडे, अभिजीत निकम, संदीप कोकणे आदींचा सहभाग होता. या शिवाय पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकातील जमादार डी.के. हवाले, रामेश्वर जाधव, रामेश्वर बगाटे, राजू पवार, इरशाद पटेल, साई पवार, विजू वाघमारे, पूनम भट, प्रतिभा पंडूरे, चालक निवृत्ती फड, संतोष उगले, नरेश वैरागळ आदींचा समावेश होता.
मध्यरात्रीही बिअरबार सुरू
By admin | Updated: May 12, 2014 00:06 IST