हिंगोली : आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी ५ मे २0१६ रोजी २९८४ विद्यार्थी एमएचटी-सीईटी-२0१६ ही परीक्षा देणार आहेत. परीक्षा यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी केले.यासाठी जिल्हा कचेरीत पूर्वतयारी बैठक झाली. यावेळी राम गगराणी, लतिफ पठाण, डॉ.इस्माईल ईनामदार, राठोड, डॉ.रोडगे आदींची उपस्थिती होती. परीक्षा केंद्रांवर योग्य तो पोलिस बंदोबस्त ठेवण्यासह साहित्याची ने-आणही बंदोबस्तात करण्यास सांगण्यात आले. महावितरणने वीज खंडित होणार नाही, याची काळजी घ्यावी. तर शल्यचिकित्सकांनी आरोग्य सुविधा देण्यास सांगण्यात आले. शहरापासून लांबच्या अंतरावरील केंद्रावर विद्यार्थ्यांना वेळेपूर्वी पोहोचविण्यासाठी व परत येण्यासाठी एस.टी.आगारप्रमुखांनी बसचे नियोजन करावे. नगरपालिकेने केंद्रावर पाण्याची सोय करावी, अशा सूचनाही दिल्या आहेत. तर इतर सर्व सुविधांसाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित प्राचार्य, मुख्याध्यापकांना सूचना देण्यास सांगण्यात आले. १४ परीक्षा केेंद्रावर १३९ हॉल असून त्यासाठी १७0 जणांचे मनुष्यबळ लागणार आहे. तर २१ अपंग परीक्षार्थ्यांची व्यवस्था तळमजल्यावर करण्यास सांगण्यात आले आहे. यात वैद्यकीय १९५१, अभियांत्रिकीसाठी २३१ तर ८0२ जण दोन्ही प्रकारात परीक्षा देणार आहेत. (प्रतिनिधी)
एमएचसीईटीला २९८४ परीक्षार्थी
By admin | Updated: April 15, 2016 01:42 IST