उस्मानाबाद : शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी शासन आदेशान्वये नाफेडमार्फत सुरू करण्यात आलेले बाजार समितीतील तूर खरेदी केंद्र मागील आठवड्यापासून बंद पडले आहे़ तूर खरेदीकेंद्र बंद पडल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत असून, अनेकांचा माल केंद्राच्या बाहेर वाहनांमध्ये पडून आहे़ तर नाफेडकडून ५० किलोमीटरच्या पुढील वाहतुकीचा खर्च मिळत नसल्याने खरेदी-विक्री संघाचीही अडचण झाल्याचे सांगितले जात आहे़तीन-चार वर्षाच्या दुष्काळानंतर शेतकऱ्यांच्या पदरी यंदा शेतमाल काही प्रमाणात पडत आहे़ ऐन दुष्काळात आभाळाला भिडलेले तुरीचे दर उत्पादन वाढल्यानंतर मात्र, घसरले आहेत़ शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी शासनाने हमीभाव खरेदी केंद्रे सुरू केली़ उस्मानाबाद येथील बाजार समितीच्या आवारातही तूर खरेदी केंद्र मागील दोन महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले आहे़ त्यामुळे उस्मानाबाद तालुका व परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता़ आजवर या केंद्रावर जवळपास १७ हजार क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे़ व्यापाऱ्यांकडून तुरीला कमी भाव मिळत असल्याने सुरू करण्यात आलेल्या या केंद्रातून ५०५० रूपये हमी भावाने तुरीची खरेदी करण्यात आली़ व्यापाऱ्यांपेक्षा तूर खरेदी केंद्रावर चांगला दर मिळू लागल्याने अनेक शेतकऱ्यांनी येथे माल आणून घालण्यास सुरूवात केली़ मात्र, मागील आठवड्यापासून बारदाना नसल्याचे कारण पुढे करीत तूर खरेदी केंद्र बंद करण्यात आले आहे़ या केंद्राने घेतलेल्या मालाद्वारे जवळपास तीन गोडाऊन फुल्ल झाले असून, आता येणारा माल ठेवायचा कोठे ? आणि नाफेडकडून ५० किलोमीटरच्या पुढील खर्च मिळत नसल्याने माल पुढे द्यायचा कसा हा प्रश्न खरेदी-विक्री संघासमोर उभा आहे़ नाफेडच्या अधिकाऱ्यांकडूनही याबाबत तोडगा काढला जात नसल्याचे सांगण्यात आले़ असे असले तरी प्रशासनाच्या गोंधळात शेतकऱ्यांची मात्र, गैरसोय होत असून, संबंधितांनी लक्ष देऊन तूर खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी होत आहे़ (प्रतिनिधी)
वाहतूक खर्चावरून गोंधळ
By admin | Updated: March 3, 2017 01:34 IST